पावसानंतर गेलच्या वादळात कोलकाताचे लोटांगण, बंगळुरुचा चार विकेट्सने विजय

बंगळुरु, १४ मे
चार्ल लँगव्हेटचा भेदक मारा, पावसाचा प्रताप आणि ख्रिस गेलचे वादळ यापुढे कोलकता नाइट रायडर्सला आज लोटांगण घालावे लागले. पावसाच्या व्यत्ययामुळे फक्त युसूफ पठाणच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर कोलकाताला १३ षटकांत ८९ धावाच करता आल्या. हे आव्हान बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सने गेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर सहज पार करत कोलकातावर  डकवर्थ-लूईस नियमांनुसार चार विकेट्स आणि तीन चेंडू राखून विजय संपादन करता आला. कोलकाताच्या गोलंदाजांवर तुटून पडत संघाला विजयाच्या उंबरठय़ावर उभ्या करणाऱ्या गेललाच यावेळी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विजयासह बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्जला मागे टाकत अव्वल स्थान पटकाविले होते. सात सामन्यांमध्ये ८७.२० च्या सरासरीने आणि २०१.८५ च्या स्ट्राईक रेटने गेलने ४३६ धावा फटकावित आज ‘ऑरेंज कॅप’ पटकाविली. आज पुन्हा एकदा सूर्यास्त झाल्यावर गेलची बॅट तळपली आणि त्याच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर बंगळुरुने कोलकाताचा पाडाव केला. फक्त १२ चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने गेलने ३८ धावांचा पाऊस पाडला आणि कोलकाताच्या गोलंदाजीतली हवा काढून टाकली. सुरुवातीला गेलने एवढे फोडून काढल्यावर त्यानंतर कोलकाताच्या गोलंदाजीमध्ये दम उरला नसेल असे वाटू लागले. पण गेलला बाद केल्यानंतर त्यांनी बंगळुरुच्या नाकी नऊ आणले होते. गेल बाद झाल्यावर ए. बी. डी‘व्हिलियर्सचा (नाबाद १३) अपवाद वगळता एकही फलंदाज जास्त काळ टिकू शकला नाही आणि कोलकाता सामना जिंकेल असे वाटू लागले होते. पण गेलने केलेल्या फटकेबाजीमुळे बंगळुरुची धावगती चांगली राहीली आणि डि‘व्हिलियर्सने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाताची ३ बाद ३० अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर युसूफने २४ चेंडूत २ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ३६ धावा फटकाविल्यामुळे संघाला १३ षटकांत ८९ धावा करता आल्या.       
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाइट रायडर्स -: १३ षटकांत ४ बाद ८९ (युसूफ पठाण ३६, चार्ल लँगव्हेट १० धावांत २ बळी) पराभूत वि. बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स -: १२.३ षटकांत ६ बाद १०५ (ख्रिस गेल ३८, जॅक कॅलिस १६ धावांत २ बळी). सामनावीर-: ख्रिस गेल.   


solapur pune pravasi sangatana