पुणे वॉरियर्सची दादागिरी सुरू

*गांगुलीचे दमदार पुनरागमन
*मिशेल मार्शचे २५ धावांत ४ बळी
हैदराबाद, १० मे

सौरव गांगुलीच्या पुनरागमनातील पहिला सामना हेच आकर्षण असलेल्या डेक्कन चार्जर्सविरूद्धच्या सामन्यात महाराजाने दमदार कामगिरी करत टीकाकारांची तोंडे बंद केली. ३८ वर्षांच्या सौरवदादाने ३२ चेंडूत ३२ धावा करत पराभवाच्या दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या पुणे वॉरियर्सला डेक्कनविरुद्ध विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. विजयासाठी १३७ धावांचे आव्हान असलेल्या वॉरियर्सने शिस्तबद्ध खेळ करत १० चेंडू व सहा विकेट राखून विजय मिळवला. तत्पूर्वी, मिशेल मार्शने मोक्याच्या क्षणी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुणे वॉरियर्सने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या डेक्कन चार्जर्सला मर्यादित धावसंख्येवर रोखले.
जेस्सी रायडरच्या २० चेंडूतील ३२ धावा व मनीष पांडेच्या ४९ धावांच्या जोरावर वॉरियर्सने धडाकेबाज सुरूवात केली. पांडे-रायडरने धडाकेबाज प्रारंभ केला तरी आजच्या सामन्याचे खरे आकर्षण होते ते महाराजाच्या कामगिरीचे. तीन चौकार व एका षटकारासह नाबाद ३२ धावा करणाऱ्या सौरवने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरविला. रायडर परतल्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या सौरवला साथ देण्यासाठी पांडे खेळपट्टीवर होता. सौरवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा केवळ दोन वर्षांचा असलेल्या पांडेच्या साथीने खेळताना त्याने आयपीएलच्या चौथ्या हंगामात त्याला डावलणाऱ्या क्रिकेटधुरिणांच्या डोळ्यात अंजन घालणारी कामगिरी केली. दीर्घकाळानंतर पदार्पण करणाऱ्या सौरवने तीन खणखणीत चौकार ठोकतानाच मिश्राला उत्तुंग षटकार खेचला व अजूनही आयपीएलमध्ये खेळण्यासाठी आपल्यात दम असल्याचे दाखवून दिले. साऱ्यांचे लक्ष सौरवच्या पुनरागमनाकडे लागले असताना केवळ एका धावेने अर्धशतक हुकलेल्या पांडेने मात्र रायडरच्या बरोबरीने कामगिरी केली.  पुणे वॉरियर्सने आयपीएलमधील आपला चौथा विजय नोंदविला तो पांडे व रायडरने सहा षटकांत दिलेल्या आक्रमक व वेगवान अर्धशतकी सलामीच्या जोरावर. प्रग्यान ओझाने रायडरला माघारी धाडून डेक्कनला पहिले यश मिळवून दिले. कर्णधार युवराजसिंग आणि डॅनिएल ख्रिश्चन फार काळ टिकले नसले तरी त्याने वॉरियर्सच्या आजच्या विजयात काही फार फरक पडला नाही.
डेक्कनचा कप्तान कुमार संगकाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलदांजी करण्याचा निर्णय घेतला खरा; मात्र मार्शने २५ धावांत चार विकेट घेत दमदार धावसंख्या करण्याचे डेक्कनचे स्वप्न धुळीस मिळवले. शिखर धवन व रवी तेजा यांनी सहा षटकात अर्धशतकी सलामी दिल्यावर डेक्कनला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली असती. मार्शच्या बरोबरीने वॉरियर्सच्या गोलंदाजांनी केलेला अचूक मारा व डेक्कनच्या फलंदाजांच्या आततायीपणाने वॉरियर्सच्या आशा कायम राहिल्या.    
संक्षिप्त धावफलक
डेक्कन चार्जर्स : २० षटकांत ८ बाद १३६ (शिखर धवन ३०, द्वारका रवी तेजा ३०, जे. पी. डय़ुमिनी ३०; युवराज सिग २/१७, मिशेल मार्श ४/२५) पराभूत वि. पुणे वॉरियर्स : १८.२ षटकांत २ बाद १३७ (जेस्सी रायडर ३५, मनीष पांडे ४९, सौरव गांगुली ३२, डॅनिएल ख्रिश्चन २/२१)  


solapur pune pravasi sangatana