पुण्याने उघडले विजयाचे दार

पंजाबवर पाच विकेट्सनी मात; राहुल शर्मा ठरला सामनावीर
मोहाली, ८ मे
पराभवाच्या गर्तेत अडकलेल्या पुणे वॉरियर्सने आज अखेर विजयाचे दार उघडले. गोलंदाजांचा भेदक मारा आणि युवराज सिंगच्या १५ चेंडूत ३५ धावांच्या खेळीच्या जोरावर पुणे वॉरियर्सने अखेर विजयाचे दार उघडले. किंग्ज इलेव्हनच्या संघाला आपल्या तिखट माऱ्याच्या जोरावर पुण्याने ११९ धावांमध्येच गुंडाळले. या माफक आव्हानाचा पाठलाग करतानाही पुण्याला धाप लागली, पण अखेर त्यांनी पाच विकेट्स आणि १७ चेंडू राखत पंजाबवर मात केली. या विजयासह पुण्याने दहाव्या स्थानावरून आठवे स्थान गाठले आहे. तर पराभूत झालेल्या पंजाबवर अखेरच्या स्थानावर जाण्याची नामुष्की ओढावली आहे. १२० धावांचे आव्हान माफक असले तरी ते गाठण्यासाठी पुण्याला पाच विकेट्स गमवाव्या लागल्या. पुण्याच्या डावाची चांगली सुरूवात झाली नसली तरी कर्णधार युवराजने पंजाबच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवत संघाला विजयाच्या उंबरठय़ावर उभे केले. त्याने १५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३५ धावा फटकाविल्या. तो बाद झाल्यावर अन्य फलंदाजांनी सहजपणे पुण्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुणे वॉरियर्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबला ११९ धावांमध्ये रोखत विजयाचा पाया रचला तर फलंदाजांनी आपली भूमिका ठीकपणे वठवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पॉल व्हल्थाटी (२३), शॉन मार्श (३२) आणि दिनेश कार्तिक (३०) यांचा अपवाद वगळता पंजाबच्या एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. भुवनेश्वर कुमार, राहुल शर्मा, मिशेल मार्श आणि वेन पार्नेल यांनी तिखट मारा करत प्रत्येकी दोन विकेट्स
पटकाविल्या.
संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन पंजाब-: २० षटकांत ८ बाद ११९ (शॉन मार्श ३२, भुवनेश्वर कुमार १४ धावांत २ बळी, राहुल शर्मा १७ धावांत २ बळी) पराभूत वि. पुणे वॉरियर्स-: १७.१ षटकांत ५ बाद १२० (युवराज सिंग ३५, शलभ श्रीवास्तव २० धावांत २ बळी) . सामनावीर-: राहुल शर्मा.  


solapur pune pravasi sangatana