बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स ८५ धावांनी विजय

बंगळुरू, ६ मे
वीरेंद्र सेहवागच्या गुरुवारच्या ‘ब्लॉकबस्टर’नंतर आज ख्रिस गेलचा ‘सुपर हिट शो’ आयपीएलमध्ये साऱ्यांनीच अनुभवला. अवघ्या ४९ चेंडूंत दहा चौकार आणि नऊ षटकारांची आतषबाजी करत गेलने १०७ धावांचा पाऊस पाडला आणि त्याच्या या धावांच्या पुरामध्ये पंजाबचा संघ वाहून गेला. यापैकी त्याने १९ चेंडूंत चौकार आणि षटकारांच्या मदतीने फटकाविल्या तब्बल ९४ धावा. आयपीएल स्पर्धेत दुसरे शतक फटकाविणारा गेल हा पहिला फलंदाज ठरला आहे. गोलंदाजीमध्येही त्याने चमक दाखवत २१ धावांत ३ विकेट्स पटकावत संघाला दणदणीत ८५ धावांनी एकहाती विजय मिळवून दिला.तडफदार शतक आणि तीन बळी या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सामनावीर ठरला अर्थातच ख्रिस गेल.
पंजाबच्या गोलंदाजांना ‘पळता भुई थोडी’ करत गेलने बंगळुरूला आपल्या वादळी शतकाच्या जोरावर दुसऱ्यांदा मोठी धावसंख्या उभारून दिली. बंगळुरूच्या अन्य फलंदाजांना जास्त धावा फटकाविता आल्या नसल्या तरी त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूला २० षटकांत सहा विकेट्सच्या मोबदल्यात २०५ धावा फटकाविता आल्या.
२०६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबची २ बाद ५ अशी केविलवाणी अवस्था झाली. त्यानंतर ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले आणि त्यांना ८५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. श्रीनाथ अरविंदने यावेळी १४ धावांत ४ बळी घेतले, तर गेलने त्याला तीन बळी घेत चांगली साथ दिली.
संक्षिप्त धावफलक
बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स : २० षटकांत ६ बाद २०५ (ख्रिस गेल १०७, रियान हॅरिस ३/३८) विजयी वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ९ बाद १२० (रायन मॅकलारेन २८, श्रीनाथ अरविंद ४/१४, ख्रिस गेल ३/२१). सामनावीर : ख्रिस गेल.   

 


solapur pune pravasi sangatana