बंगळुरूचा कोचीवर ९ विकेट्सनी विजय

बंगळुरू, ८ मे
आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर ख्रिस गेलने आज पुन्हा एकदा बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या पदरात विजयाचे माप टाकले. २४ धावांत १ विकेट आणि १६ चेंडूत ४४ धावा फटकावत गेलने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बंगळुरूच्या गोलंदाजांनी १२५ धावांत कोची केरळ टस्कर्सला रोखत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर फलंदाजांनी हे माफक आव्हान नऊ विकेट्स आणि ४१ चेंडू राखत सहजपणे गाठले. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या गेलला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
कोचीच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण हा निर्णय फलंदाजांचा ‘फ्लॉप शो’मुळे त्यांच्यावरच उलटला. मायके क्लिंगर (२४) आणि ब्रेन्डन मॅक्क्युलम (२२) या दोन्हीही सलामीवीरांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली होती. पण हे दोघेही सलामीवीर बाद झाल्यावर अन्य फलंदाजांना मात्र संघाला डाव सावरता आला नाही.
 रवींद्र जडेजाने (२३) संघाची धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला खरा, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही आणि कोचीचा संघ १२५ धावाच करू शकला.
१२६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या सलामीवीरांनी दणक्यात सुरूवात केली. गेल आणि तिलकरत्ने दिलशान हे दोघेही मोठय़ा फटक्यांसाठी ओळखले जातात आणि या दोघांनीही निराश न करता कोचीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
गेलने यावेळी फक्त १६ चेंडूत तीन चौकार आणि पाच खणखणीत षटकारांच्या जोरावर ४४ धावांची तुफानी खेळी साकारली. तर दिलशानने त्याला सुयोग्य साथ देत ३१ चेंडूत आठ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ५२ धावा फटकाविल्या.
मोठे फटके मारण्याच्या नादात गेल बाद झाला असला तरी दिलशानने विराट कोहलीच्या (नाबाद २७) साथीने विजयावर सहजपणे शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
कोची टस्कर्स केरळ-: २० षटकांत ९ बाद १२५ (मायकेल क्लिंगर २४, श्रीनाथ अरविंद २० धावांत २ बळी, डॅनियल व्हेटोरी २४ धावांत २ बळी) पराभूत वि. बंगळुरु रॉयल चॅलेजर्स -: १३.१ षटकांत १ बाद १२८ (तिलकरत्ने दिलशान नाबाद ५२, ख्रिस गेल ४४, विनय कुमार १८ धावांत १ बळी). सामनावीर-: ख्रिस गेल.  


solapur pune pravasi sangatana