बंगळुरूचा पुण्यावर २६ धावांनी विजय

बंगळुरू, २९ एप्रिल
विराट कोहलीने केलेले शैलीदार अर्धशतक व ख्रिस गेलच्या आक्रमक ४९ धावा याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पुणे वॉरियर्सला २६ धावांनी हरविले. विजयासाठी १८२ धावांचा पाठलाग करताना पुणे वॉरियर्सला २० षटकांत ५ बाद १५५ धावांपर्यंत मजल गाठता आली.पुणे वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले. तथापि ख्रिस गेल व तिलकरत्ने दिलशान यांनी सलामीसाठी ६.४ षटकांत ५७ धावांची भागीदारी करीत पुणे वॉरियर्सच्या आशा फोल ठरविल्या. दिलशानने तीन चौकारांसह १९ धावा केल्या. पाठोपाठ गेलही तंबूत परतला. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले. त्याने २६ चेंडूंमध्ये चार चौकार व चार षटकारांसह ४९ धावा केल्या. त्यानंतर विराट कोहली याने अब्राहम डी’व्हिलियर्सच्या साथीत धावांचा वेग वाढविला. त्यांनी ६६ धावांची भर घातली. डिव्हीलीयर्स २६ धावा काढून तंबूत परतला. त्यामध्ये त्याने एक चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. कोहलीने शानदार खेळ करीत ४२ चेंडूमध्ये ६७ धावा केल्या. त्यामध्ये त्याने चार चौकार व चार षटकार अशी फटकेबाजी केली. सौरभ तिवारी यानेही झटपट १४ धावा केल्या. निर्धारित षटकांत त्यांनी ५ बाद १८१ अशी भक्कम धावसंख्या उभारली.
पुणे वॉरियर्सची सुरुवात अपेक्षेइतकी चांगली झाली नाही. सलामीवीर टीम पेनने (८) याची विकेट त्यांनी लवकर गमावल्यामुळे त्यांच्या धावांचा वेग रोखला गेला. एका बाजूने आत्मविश्वासाने खेळणाऱ्या जेस्सी रायडरने ३४ चेंडूंत दोन षटकार व चार चौकारांसह ५१ धावा केल्या. मधल्या फळीत कर्णधार युवराजसिंग याने तडाखेबाज खेळ केला. त्याने १६ व्या षटकांत सईद महमंद याच्या गोलंदाजीवर दोन षटकार व एक चौकार अशी फटकेबाजी केली. मात्र त्याच प्रयत्नात तो झहीरखानच्या षटकात बाद झाला. त्याने २३ चेंडूंमध्ये तीन षटकार व दोन चौकारांसह ४१ धावा केल्या. रॉबिन उथप्पाला सूर गवसला परंतु तोपर्यंत लक्ष्य त्यांच्या आवाक्याबाहेर गेले होते. त्याने शेवटच्या षटकांत दोन चौकार व एक षटकार ठोकला. तथापि त्याची ही खेळीही कमी पडली. त्याने नाबाद २३ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स :
२० षटकांत ५ बाद १८१ (ख्रिस गेल ४९, विराट कोहली ६७) विजयी वि.  पुणे वॉरियर्स : २० षटकांत ५ बाद १५५ (जेस्सी रायडर ५१, युवराज सिंग ४१, रॉबिन उथप्पा नाबाद २३).


solapur pune pravasi sangatana