भारतीय गोलंदाजांचा विंडीजवर अंकुश!

सरवान आणि सॅम्युअल्स यांची अर्धशतके
पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद), ६ जून / पी.टी.आय.


रामनरेश सरवान आणि मार्लन सॅम्युअल्स यांच्या अर्धशतकांच्या बळावर धावांसाठी झगडणाऱ्या वेस्ट इंडिजने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५० षटकांमध्ये ९ बाद २१४ अशी धावसंख्या उभारली.
नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. १८.२ षटकांत फक्त ५९ धावांत विंडीजचे तीन मोहरे तंबूत परतले होते. परंतु सरवान आणि सॅम्युअल्स यांनी चौथ्या विकेटसाठी ११८ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.
सरवानने ९४ चेंडूंत पाच चौकारांसह ५६ धावा केल्या, तर सॅम्युअल्सने ७५ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांसह ५५ धावा काढल्या. परंतु आक्रमणाच्या नादात सरवान आणि सॅम्युअल्स दोघेही बाद झाले.
वेस्ट इंडिजच्या डावात फक्त सरवान आणि सॅम्युअल्सची खेळी हेच आशेचे किरण ठरले. बाकी अखेरच्या १२ षटकांत वेस्ट इंडिजने ७३ धावा केल्या. परंतु सहा विकेटस् गमावल्या.
ड्वेन ब्राव्होने २० चेंडूंत २२ धावा केल्या. तर सलामीवीर किर्क एडवर्डस्ने ४५ चेंडूंत २१ धावा काढल्या. क्वीन्स पार्क ओव्हलच्या धीम्या खेळपट्टीवर ऑफ-स्पिनर हरभजन सिंगने छान गोलंदाजी केली. फक्त ३२ धावांत त्याने ३ बळी घेतले. तथापि, प्रवीण कुमार (२/३७), मुनाफ पटेल (२/४७) आणि कर्णधार सुरेश रैना (२/२३) यांनीही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला.
हरभजन सिंग आणि अमित मिश्रा या भारताच्या फिरकी माऱ्यापुढे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे काहीच चालले नाही. या दोन गोलंदाजांच्या २० षटकांत फक्त ७० धावा विंडीजने काढल्या.   

धावफलक
वेस्ट इंडिज  : लेंड लिम्सन झे. हरभजन गो. प्रवीण कुमार ६, किर्क एडवर्डस् झे. कोहली गो. हरभजन २१, डॅरेन ब्राव्हो झे. रोहित शर्मा गो. मुनाफ ४, रामनरेश सरवान झे. पार्थिव पटेल गो. मुनाफ ५६, मार्लन सॅम्युअल्स त्रि. गो. रैना ५५, ड्वेन ब्राव्हो यष्टीचीच गो. हरभजन २२, कार्लटन बॉग पायचीत गो. हरभजन १६, डॅरेन सॅमी पायचीत गो. प्रवीण कुमार ४, रवी रामपॉल नाबाद ९, देवेंद्र बिशू पायचीत गो. रैना ०, अ‍ॅन्थोनी मार्टिन नाबाद २ . अवांतर १९ . एकूण ५० षटकांत ९ बाद २१४.
बाद क्रम : १-२३, २-२८, ३-५९, ४-१४१, ५-१७७, ६-१९१, ७-१९८, ८-२०४, ९-२०६
 गोलंदाजी : प्रवीण कुमार १०-१-३७-२, मुनाफ पटेल ९-१-४७-२, अमित मिश्रा १०-१-३८-०, हरभजन सिंग १०-३२-३, युसूफ पठाण २-०-१६-०, सुरेश रैना ६-०-२३-२, विराट कोहली ३-१-१५-०.  


solapur pune pravasi sangatana