मुंबईचा दिल्लीवर ३२ धावांनी विजय

अंबाती रायडू ठरला सामनावीर
मुंबई, ७ मे

आयपीएलच्या चौथ्या हंगामातील दोन्हीही सामन्यांत चारी मुंडय़ा चीत करीत दिल्लीवर मुंबईचेच राज्य असल्याचे आज स्पष्ट झाले. सेहवाग आपल्या क्रिकेटमधील गुरू असलेल्या सचिनच्या मुंबई इंडियन्सवर चाल करून आला होता. पण गुरू हा गुरूच असतो हे सचिनने दुसऱ्यांदा विजय मिळवताना दाखवून दिले आणि साऱ्यांच्या मुखातून निघाले.. वा गुरू! या विजयामुळे १० सामन्यांत १६ गुणांनिशी आघाडीवर असलेल्या मुंबईने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे.
अंबाती रायडूचे अर्धशतक, रोहित शर्मा आणि सलामीवीर एडन ब्लिझार्ड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईला प्रथम फलंदाजी करताना १७८ धावा करता आल्या. दिल्लीचा संघ या वेळी सेहवागच्याच भरोशावर होता. पण सेहवाग झटपट बाद झाला आणि मुंबईने विजयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईच्या गोलंदांजांनी दिल्ली डेअरडेव्हिल्सला १४६ धावांमध्ये गुंडाळत ३२ धावांनी सोपा विजय मिळवून दिला. अर्धशतक फटकावून संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देणाऱ्या रायडूला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
मुंबई इंडियन्सच्या सलामीच्या जोडीचा प्रश्न आज अखेर निकाली लागला आणि मुंबईला स्पर्धेत पहिल्यांदाच अर्धशतकी सलामी मिळाली. एडन ब्लिझार्ड दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडला. मॉर्न मॉर्केलच्या दुसऱ्या षटकात त्याने खणखणीत पाच चौकार लगावत २० धावा वसूल केल्या. सचिन तेंडुलकर (१४) मोठे फटके मारत नसला तरी ब्लिझार्डने एक बाजू लावून धरत सर्व कसर भरून काढत मुंबईला पहिल्या पाच षटकांमध्ये दहाच्या सरासरीने ५० धावा करून दिल्या. सचिनला इरफानने त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्यानंतरच्या षटकात ब्लिझार्डही बाद झाला, पण बाद होण्यापूर्वी त्याने आठ चौकारांच्या मदतीने ३७ धावा फटकाविल्या. हे दोघे बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि रोहित शर्मा या दोन्ही युवा फलंदाजांनी संघाच्या धावसंख्येला आकार देण्याचे काम चोख बजावत तिसऱ्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचली.  रायडूने यावेळी सात चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५९ धावा फटकाविल्या, तर रोहितचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले. या दोघांच्या महत्वपूर्ण खेळीच्या जोरावर मुंबईला १७८ धावा करता आल्या.
मुंबईचे १७९ धावांचे आव्हान घेऊन दिल्लीचा संघ मैदानात उतरला तेव्हा साऱ्याचेच लक्ष सेहवागकडे होते. पण सेहवागने (२) आज निराशाच केली. तो बाद झाल्यावर दिल्लीची ४ बाद ७ अशी दयनीय अवस्था झाली होती. पण वेणुगोपाल राव आणि जेम्स होप्स यांनी पाचव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी रचल्याने दिल्लीला थोडेसे हायसे वाटत होते. पण धवल कुलकर्णीने रावला त्रिफळाचीत करत ही जोडी मोडली.  होप्सने त्यानंतर अर्धशतक फटकावले खरे, पण त्याच्या या खेळीने संघाला विजय मिळवता आला नाही. मलिंगा, मुनाफ, हरभजन आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी दोन मोहरे बाद केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ४ बाद १७८ (अंबाती रायडू ५९, रोहित शर्मा ४९, इरफान पठाण १/२३) विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १९.५ षटकांत सर्वबाद १४६ (जेम्स होप्स ५५, लसिथ मलिंगा २/१८, किरॉन पोलार्ड २/२४). सामनावीर : अंबाती रायडू.    

‘ऑरेंज कॅप’ सेहवागकडेच
डेक्कनविरूद्धच्या सामन्यात तडफदार शतक ठोकत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने मुंबईचा कर्णधार आणि त्याचा क्रिकेटमधील गुरू सचिन तेंडुलकरकडून हिरावून घेतली होती. शनिवारच्या सामन्यात सचिन पुन्हा एकदा ‘ऑरेंज कॅप’ पटकाविणार की वीरू ती आपल्याकडेच राखणार, याकडे साऱ्यांचेच डोळे लागलेले होते. वीरूच्या ४२२ धावा होत्या. त्यामुळे सचिनने मोठी खेळी साकारल्यास त्याच्याकडे ‘ऑरेंज कॅप’ येऊ  शकली असती. पण सचिन १४ धावांवर बाद झाला आणि त्याच्या एकूण धावा झाल्या ३६५. त्यामुळे ‘ऑरेंज कॅप’ आपसुकच वीरूकडेच राहिली.  


solapur pune pravasi sangatana