मुंबईचा पुण्यावर सात विकेट्सनी विजय

* मुनाफ पटेल ठरला सामनावीर
मुंबई, २० एप्रिल
आपला खास ‘पुणेरी बाणा’ घेऊन मैदान मारायचेच, या ध्येयाने आलेल्या सहाराच्या वॉरियर्सना मुंबईने आपल्या जगविख्यात ‘स्पिरिट’च्या जोरावर चीत करीत ‘आम्हीच मराठमोळे शूरवीर’ असल्याचे दाखवून दिले. मुंबईच्या भेदक माऱ्यापुढे पुण्याला ११८ धावाच करता आल्या. पण हे आव्हान माफक वाटत असलेले तरी ते पूर्ण करण्यासाठी मुंबई इंडियन्सला २० षटके खेळावी लागली. अखेरच्या चेंडूमध्ये विजयासाठी एक धाव हवी असताना रोहित शर्माने कव्हरच्या दिशेने खणखणीत षटकार लगावत संघाला सात विकेट्सने विजय मिळवून दिला. या विजयाने मुंबईने गुणतालिकेत दुसरे स्थान पटकाविले आहे. आठ धावांत पुण्याच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडणाऱ्या मुनाफ पटेलला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
११९ धावांचे आव्हान मुंबईचा संघ १५ षटकांमध्येच पूर्ण करेल असे वाटत होते. कर्णधार सचिन तेंडुलकर (३५) आणि अंबाती रायडू (३७) या बिनीच्या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी रचल्यावर मुंबई सहज सामना जिंकेल असे वाटत होते. पण हे दोघे बाद झाल्यावर पुण्याच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना वेसण घालण्याचा प्रयत्न केला, पण विजय मात्र त्यांच्या नशिबात लिहिलेलाच नव्हता. अखेरच्या षटकात पाच धावा हव्या असल्या तरी मुंबईला त्यासाठी सहाही चेंडू खेळावे लागले. या षटकात अ‍ॅन्ड्रय़ू सायमंडस् (नाबाद १६) दोनदा धावचीत होता-होता वाचला. अखेरच्या चेंडूमध्ये विजयासाठी एक धाव हवी असताना रोहित शर्माने (नाबाद २०) खणखणीत षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून पुण्याचा कर्णधार युवराज सिंगने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण मुंबईच्या भेदक माऱ्यामुळे हा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला. अली मुर्तझाला पहिले षटक देत सचिनने सुरुवातीपासूनच प्रयोगाचा श्रीगणेशा केला आणि त्याचे प्रत्येक प्रयोग यावेळी यशस्वी ठरले. मलिंगाला दुसरे षटक दिल्यावर त्याने अबू नचीम अहमदला दुसऱ्या बाजूने गोलंदाजीला आणत दुसरा प्रयोग केला आणि अबूने आपल्या पहिल्याच षटकात जेस्सी रायडर (१२) आणि मिथुन मन्हास (०) या दोघांनाही बाद करत पुण्याला दुहेरी धक्का दिला. त्यानंतर सचिनने दुसऱ्या टोकाकडून अलीला काढून मुनाफ पटलेला गोलंदाजीला आणलेआणि त्यानेही त्या षटकात दोन विकेटस् घेत पुण्याला बॅकफूटवर ढकलले. यावेळी रॉबिन उथप्पा हा एकमेव फलंदाज खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. त्याने सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४५ धावा फटकाविल्या असल्या तरी त्याला संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात अपयश आले. यावेळी मुनाफने भेदक गोलंदाजी करत फक्त आठ धावांमध्ये तीन विकेट्स घेतल्या, तर मलिंगा, मुर्तझा आणि अबू यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत त्याला सुयोग्य साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
पुणे वॉरियर्स : १७.२ षटकांत सर्वबाद ११८ (रॉबिन उथप्पा ४५, मुनाफ पटेल ३/८ बळी, अबू नचीम अहमद २/१३) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : २० षटकांत ३ बाद १२४ (अंबाती रायडू ३७, सचिन तेंडुलकर ३५, श्रीकांत वाघ १/९). सामनावीर : मुनाफ पटेल.


solapur pune pravasi sangatana