मुंबईच्या विजयाचे फासे ‘फिरले’!डेक्कन चार्जर्सचा १० धावांनी विजय

मुंबई, १४ मे
वानखेडे स्टेडियमच्या फिरणाऱ्या खेळपट्टीने मुंबई इंडियन्सच्या विजयाचे फासे फिरविण्याचाही करिष्मा दाखविला. शेवटच्या षटकात किरॉन पोलार्डने आनंद राजनवर तुफानी हल्ला चढवून विजयाच्या आशा प्रज्वलित केल्या खऱ्या. पण दोन चेंडू शिल्लक असताना पोलार्ड बाद झाला आणि मुंबईचा पराभव आता अटळ असल्याचे स्पष्ट झाले. राजनने पाचवा चेंडू वाइड टाकून पुन्हा २ चेंडूत १२ धावा असे मुंबईला अवघड गणित घातले. परंतु मुंबई वानखेडेच्या परीक्षेत नापास झाली. डेक्कनने १० धावांनी सामना जिंकला. त्यामुळे गुणतालिकेत अव्वल स्थान प्राप्त करण्यात मुंबईला अपयश आले. दमदार नाबाद १८ धावा आणि ४ षटकांत १८ धावांत एक बळी घेणाऱ्या अमित मिश्राला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
मुंबईची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. वानखेडेची खेळपट्टी आपले रंग दाखवित असताना संगकाराने गोलंदाजांमध्ये अपेक्षित बदल करून त्याचा फायदा घेतला. सचिन तेंडुलकरने एकीकडे पाय रोवले असताना दुसरीकडून मुंबईचे एकेक वीर धारातीर्थी पडत होते. आनंद राजनचे १६वे षटक डेक्कनच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. राजनने या षटकात टी. सुमन आणि सचिन हे डेक्कनच्या विजयातील प्रमुख अडसर दूर केले. सचिनने ३ चौकारांसह ३७ धावा केल्या. तो जोवर मैदानावर होता, तोवर मुंबईचा विजय निश्चित मानला जात होता. उत्तरार्धात पोलार्डने सामन्यातील रोमांच वाढविला. परंतु मुंबईला डेक्कनने विजयापासून दूर ठेवले. पोलार्डने फक्त १३ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा काढल्या.
प्रथम फलंदाजी घेण्याचा डेक्कन चार्जर्सचा निर्णय फारसा फलदायी ठरला नाही. मुंबईचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने डेक्कनच्या फलंदाजांवर चांगलीच वेसण घातल्यामुळे त्यांना निर्धारित षटकांत जेमतेम ६ बाद १३५ धावा करता आल्या.
मुनाफ पटेलच्या अखेरच्या षटकात डेक्कनच्या शिखर धवन आणि विशेषत: अमित मिश्रा यांनी फटकेबाजी करून २३ धावा चोपल्या. त्यामुळेच डेक्कनला ही दिलासादायी धावसंख्या उभारता आली. पण हे षटक मिश्रा आणि मुनाफ यांच्यातील वाक्युद्धामुळे गाजले.
‘यॉर्करचा बादशाह’ लसिथ मलिंगाने दुसऱ्याच चेंडूवर मायकेल लम्बचा शून्यावर त्रिफळा उडवून डेक्कनला पहिला धक्का दिला. मग सन्नी सोहेलच्या साथीने कुमार संगकाराने डेक्कनला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला. धवल कुलकर्णीने संगकाराला २७ धावांवर बाद करून ही जोडी फोडली. पोलार्डने त्याचा लाजवाब झेल टिपला. तर सन्नी सोहलने २० धावा केल्या. यात त्याने मुनाफला मिडविकेटला तर टी. सुमनला लाँगऑफला षटकार मारला. मग ठराविक अंतराने डेक्कनचे फलंदाज बाद होत गेले. डॅनियल ख्रिश्चनने १८ धावा केल्या. धवलने त्याचा त्रिफळा उडविला.
उत्तरार्धात शिखर धवन आणि अमित मिश्रा यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद ३० धावांची भागीदारी करून डेक्कनला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. धवनने १८ चेंडूंत २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २७ धावा केल्या. तर मिश्राने फक्त ६ चेंडूंत चार चौकारांसह नाबाद १८ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
डेक्कन चार्जर्स : २० षटकांत ६ बाद १३५ (सन्नी सोहल २०, कुमार संगकारा २७, शिखर धवन नाबाद २७, अमित मिश्रा नाबाद १८; धवल कुलकर्णी ३/२६) विजयी वि. मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १२५ (सचिन तेंडुलकर ३७, किरॉन पोलार्ड २४, हरभजन सिंग नाबाद १७; इशांत शर्मा २/३०, आनंद राजन ३/२७)
सामनावीर : अमित मिश्रा.    


solapur pune pravasi sangatana