मुंबईने किंग्ज इलेव्हन पंजाबचा २३ धावांनी पराभव करीत आपणच आयपीएलचे ‘लॉर्ड’ असल्याचे सिद्ध केले

मुंबई, २ मे
मुंबई इंडियन्सने मुंबईत अभिमानाने झेंडा फडकविला. गुणतालिकेत अव्वल स्थान, सचिन तेंडुलकरला ऑरेंज कॅप या खास वैशिष्टय़ांनिशी मुंबईने किंग्ज इलेव्हन पंजाबचा २३ धावांनी पराभव करीत आपणच आयपीएलचे ‘लॉर्ड’ असल्याचे सिद्ध केले. फलंदाजीत एक चौकार आणि दोन षटकारासह ११ चेंडूंत २० धावा, दोन महत्त्वपूर्ण झेल आणि गोलंदाजीत १८ धावांत एक विकेट अशी अष्टपैलू कामगिरी बजावणाऱ्या किरॉन पोलार्डने सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले.सचिन तेंडुलकरने पहिले षटक हरभजन सिंगला देण्याचा निर्णय विलक्षण फलदायी ठरला. अ‍ॅडम गिलख्रिस्टला भोपळाही फोडता आला नाही. पण पॉल व्हल्थाटी डगमगला नाही. ३ धावांवर मिळालेल्या जीवदानाचा त्याने पुरेपूर फायदा उचलत शॉन मार्शच्या साथीने पंजाबचा डाव सावरला. व्हल्थाटी आणि मार्श जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करीत विजयाची उमेद निर्माण केली. व्हल्थाटीने टी. सुमनला मारलेला षटकार ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या उतरत खाली आला. सचिनने ११व्या षटकात अ‍ॅन्ड्रय़ू सायमंडस्कडे चेंडू दिला. हा निर्णय मुंबईच्या दृष्टीने फायदेशीर ठरला. व्हल्थाटीने सायमंडस्वर हल्ला चढवित चौथ्या चेंडूवर उंच षटकार मारला. पण पुढच्या चेंडूवर पुन्हा उंच स्ट्रोक खेळण्याच्या नादात त्याचा उडालेला झेल किरॉन पोलार्डने लाँग ऑफला झेलला. व्हल्थाटी (३३) बाद झाल्यावर पंजाबच्या आशा-अपेक्षांचे जहाज फुटले. एकीकडून शॉन मार्श किल्ला लढवित होता. पण त्याला समोरून तोलामोलाची साथ लाभली नाही.
मार्शने ४७ चेंडूंत आठ चौकारांसह झुंजार ६१ धावा केल्या. हरभजन सिंग, लसिथ मलिंगा आणि मुनाफ पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेटस् घेतल्या.
त्याआधी, मुंबई इंडियन्सची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. तिसऱ्या षटकात डेव्ही जेकॉब्जला (१०) बाद करून विपुल शहाने पंजाबला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सच्या नित्य प्रथेप्रमाणे सचिन तेंडुलकर आणि अंबाती रायडू ही जोडी जमली. या जोडीने मग पंजाबच्या गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढविला. प्रवीण कुमारसारख्या कसलेल्या गोलंदाजाला १२व्या षटकात रायडूने चांगला चोपला.
त्याच्या तिसऱ्या चेंडूवर मिडविकेटला षटकार ठोकल्यानंतर पुढील दोन चेंडूंवर चौकार मारले. पीयूष चावलाने रायडूला बाद करून ही जोडी फोडली. रायडूने षटकाराच्या अपेक्षेने मारलेला फटका डीप मिडविकेटला दिनेश कार्तिकने लाजवाबरीत्या टिपला. सचिन-रायडू यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ चेंडूंत ९५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. रायडूने ३७ चेंडूंत ८ चौकार, एक षटकारासह ५१ धावा केल्या. त्यानंतर १७व्या षटकात हॅरिसला पहिल्याच चेंडूवर चौकार पेश करीत अर्धशतक झळकावणारा सचिन दुसऱ्याच चेंडूवर अभिषेक नायरद्वारे झेलबाद झाला. सचिनने ४५ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह ५१ धावा केल्या. मग उरलेल्या हाणामारीच्या षटकात किरॉन पोलार्ड (२०) आणि रोहित शर्मा (१८) यांनी वेगाने धावा जमविल्या. त्यामुळेच मुंबईला ५ बाद १५९ धावा करता आल्या. पीयूष चावलाने ३७ धावांत दोन विकेटस् घेतल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ५ बाद १५९ (सचिन तेंडुलकर ५१, अंबाती रायडू ५१, किरॉन पोलार्ड २०, रोहित शर्मा १८; पियुष चावला २/३७) विजयी वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ८ बाद १३६ (पॉल व्हल्थाटी ३३, शॉन मार्श ६१; हरभजन सिंग २/१५, लसिथ मलिंगा २/१९, मुनाफ पटेल २/१८); सामनावीर : किरॉन पोलार्ड.


solapur pune pravasi sangatana