युवराजवर धोनी पडला भारी ; चेन्नईचा पुण्यावर २५ धावांनी विजय

मायकेल हसी ठरला सामनावीर
चेन्नई, २५ एप्रिल

युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघेही चांगले मित्र असले तरी मैदानात धोनीच भारी असल्याचे आज दिसून आले. मायकेल हसीच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करता १४२ धावा केल्या. हे आव्हान माफक वाटत असले तरी धोनीने गोलंदाजांचा सुरेख वापर आणि अचूक क्षेत्ररक्षण लावत पुणे वॉरियर्सला आव्हानापर्यंत पोहोचू दिले नाही. युवराजने एकाकी किल्ला लढविण्याचा प्रयत्न केला असला तरी तो यावेळी अपयशीच ठरला. अ‍ॅल्बी मॉर्केलने यावेळी युवराजसह मनीष पांडे आणि मोहनिश मिश्रा यांना बाद करत पुण्याला विजयापासून दूर केले. भेदक गोलंदाजी आणि दमदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने पुणे वारियर्सचा २५ धावांनी पराभव केला. या विजयाने चेन्नईचा संघ चौथ्या स्थानावर पोहोचला असून पराभवामुळे पुण्याच्या संघ आठव्या स्थाानवर आहे.
१४३ धावांचा पाठलाग करताना पुण्याच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. अ‍ॅल्बी मॉर्केल आणि आर. अश्विन यांनी पुण्याच्या संघाला चार धक्के देत त्यांची ४ बाद ४० अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर कर्णधार युवराज सिंगने (३४) पुण्याच्या संघाची पडछड थांबवली. पण त्याला मोठी खेळी साकारून संघाला विजय मिळवून देता आले नाही, भेदक मारा करणाऱ्या मॉर्केलनेच त्याला १९ व्या षटकात तंबूत धाडले आणि त्यानंतर पुण्याच्या हातून सामनाच निसटला. मॉर्केलने यावेळी सर्वाधिक तीन बळी घेतले. तर आर. अश्विन आणि डग बोलिंगर यांनी स्वस्तात प्रत्येकी दोन फलंदाजांना बाद करत मॉर्केलला चांगली साथ दिली.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून पुण्याच्या संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी चेन्नईला १४२ धावांमध्ये रोखत हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले. सलामीवीर मायकेल हसी आणि मुरली विजय (३१) यांनी यावेळी ६४ धावांची सलामी दिली. पण पहिली विकेट पडल्यावर हसीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. हसीने यावेळी सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६१ धावा फटकाविल्या. पुण्याने आज संघात घेतलेल्या जेरोम टेलरने आज चेन्नईच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज -: २० षटकांत ६ बाद १४२
(मायकेल हसी ६१, जेरोम टेलर ३० धावांत ३ बळी) विजयी वि.
पुणे वॉरियर्स-: २० षटकांत ९ बाद ११७
(युवराज सिंग ३४, अ‍ॅल्बी मॉर्केल २९ धावांत ३ बळी, आर. अश्विन २० धावांत २ बळी)
सामनावीर-: मायकेल हसी.


solapur pune pravasi sangatana