राजस्थानचा मुंबईवर दहा विकेट्सनी दणदणीत विजय

शेन वॉर्नला विजयी निरोप *वॉटसनची अष्टपैलू कामगिरी
 मुंबई, २० मे

आपला एकेकाळचा वरिष्ठ संघसहकारी शेन वॉर्नला आपण आयपीएलमधून विजयानेच निरोप द्यायचा हे मनाशी ठरवूनच तो मैदानात उतरला.. गोलंदाजीत त्याने १९ धावांत ३ विकेट्स घेत मुंबईच्या धावसंख्येला वेसण घालण्याचे काम चोख बजावले.. फलंदाजीत तर त्याने कमालच केली.. मलिंगासह मुंबईच्या गोलंदाजांना त्याने प्रथम श्रेणीतल्या गोलंदाजांसारखी वागणूक देत निष्प्रभ केले.. ९ चौकार आणि ६ षटकांराची आतिषबाजी करत त्याने नाबाद ८९ धावांची वादळी खेळी साकारली आणि त्याच्या या अष्टपैलू खेळीपुढे मुंबई इंडियन्सला लोटांगण घालावे लागले.. त्यामुळेच राजस्थानने मुंबईला दहा विकेटस्ने पराभूत करत आपल्या लाडक्या कर्णधार वॉर्नला विजयाने निरोप दिला. सामनावीर अर्थातच शेन वॉटसन ठरला.
या पराभवानंतर आता मुंबईच्या खात्यावर १६ गुण जमा आहेत आणि त्यांची अखेरची साखळी लढत २२ मे रोजी कोलकात्याशी होत आहे. गुणतालिकेत कोलकाता १६ गुणांवर तर पंजाब १४ गुणांवर आहे. त्यामुळे मुंबईचे टेन्शन वाढले आहे. मुंबईचे १३४ धावांचे आव्हान राजस्थानने सहजपणे पार केले केले ते वॉटसनच्या झंझावाती फलंदाजीमुळे. मुंबईच्या गोलंदाजीचा त्याने यावेळी पालापाचोळाच केला. समोर मलिंगा असो किंवा मुनाफ त्याने कोणाचीही तमा न बाळगता पहिल्या सहा षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. ‘पॉवर प्ले’नंतरही त्याचा सूर बदलला नाही. फक्त ४७ चेंडूत नाबाद ८९ धावांची वादळी खेळी साकारत त्याने संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. ८९ धावांपैकी ७२ धावा त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत लुटल्या. दुसऱ्या टोकाकडून त्याला राहुल द्रविडनेही (नाबाद ४३) चांगली साथ दिली आणि त्यामुळेच राजस्थानला एकही विकेट न गमावता विजय साकारता आला.
तत्पूर्वी, आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थानच्या संघाचा कर्णधार शेन वॉर्न गोलंदाजीचे सारथ्य करेल असे वाटले होते. पण चाणाक्ष वॉर्नने शेन वॉटसनला गोलंदाजीला आणले आणि त्यानेही वॉर्नचा विश्वास सार्थ ठरवत मुंबईला सुरुवातीलाच दोन धक्के दिले. मुंबईची २ बाद १७ अशी अवस्था झाली तरी मुंबईचा कर्णधार सचिन तेंडुलकर (३१)ने रोहित शर्माला साथीला घेत तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. हे दोघे खेळपट्टीवर असल्याने मुंबई दिडशे धावांचा पल्ला गाठणार असे वाटत होते. पण अमित सिंगला ‘थर्डमॅन’ला मोठा फटका मारण्याचा नादात सचिन बाद झाला. सचिन तंबूत परतल्यावर संघाची सर्व जबाबदारी रोहितने आपल्या खांद्यावर घेतली आणि अर्धशतक फटकावून ती पारही पाडली. रोहितने ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५८ धावा फटकावत संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला, पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ न लाभल्याने मुंबईला दिडशे धावांचा पल्लाही गाठता आला नाही. अखेरच्या सामन्यात अखेरचे षटक येईपर्यंत वॉर्नला एकही विकेट मिळालेली नव्हती. अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याच्या गोलंदाजीवर अशोक मनेरियाने रोहितचा झेल सोडला. पण अखेर वॉर्नने रोहितलाच यष्टीचीत करत विकेट मिळवली. वॉटसनने यावेळी भेदक मारा करत १९ धावांत ३ मोहरे टिपले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स :
२० षटकांत ५ बाद १३३ (रोहित शर्मा ५८, सचिन तेंडुलकर ३१, शेन वॉटसन १९ धावांत ३ बळी) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १३.१ षटकांत बिन बाद १३४ (शेन वॉटसन नाबाद ८९, राहुल द्रविड नाबाद ४३) सामनावीर : शेन वॉटसन.


solapur pune pravasi sangatana