राजस्थानचा मुंबईवर ‘रॉयल’ विजय

जयपूर, २९ एप्रिल
जोहान बोथाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने बलाढय़ मुंबई इंडियन्स संघावर सात विकेट व ११ चेंडू राखून मात करीत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या लढतीत बोथा (३/६), अशोक मणेरिया (२/२०) व अमितसिंग (२/१४) यांनी केलेल्या प्रभावी व अचूक माऱ्याच्या जोरावर राजस्थानने मुंबईला २० षटकांत ८ बाद ९४ धावांवर रोखले. तेथेच राजस्थानचा विजय निश्चित झाला होता. मात्र ९५ धावांचे आव्हान पार करताना राजस्थानला तीन विकेटस् गमवाव्या लागल्या. शेन वॉटसन (२६) व बोथा (४४) यांनी शैलीदार फलंदाजी करीत संघास १९ व्या षटकांत विजय मिळवून दिला. राजस्थान संघाचे आठ सामन्यांअखेर नऊ गुण झाले आहेत.
येथील खेळपट्टीवर गोलंदाजांना साथ मिळते हे लक्षात घेऊनच राजस्थानचा कर्णधार शेन वॉर्न याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्याचा हा निर्णय त्याच्या सहकाऱ्यांनी सार्थ ठरविला. पहिल्यापासूनच त्यांच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. डेव्ही जेकब्ज (१५), अंबाती रायडु (११), या स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणारा रोहित शर्मा (१३), अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स (१७), हरभजनसिंग (नाबाद १०) हे पाचच फलंदाज दोन आकडी धावा करू शकले. त्यांच्याकडून मोठी भागीदारी झालीच नाही. त्यामुळेच मुंबईला तीन आकडी धावाही करता आल्या नाहीत. राजस्थानकडून बोथा याने दोन षटकांत केवळ सहा धावा देत तीन बळी घेतले.
राजस्थानने राहुल द्रविडची विकेट लवकर गमावली तथापि त्यानंतर वॉटसन व बोथा यांनी ३९ धावांची भर घातली आणि संघाचे अर्धशतकही झळकावले. तथापि लगेचच वॉटसन हा लसित मलिंगाच्या गोलंदाजीचा शिकार बनला. वॉटसन याने तीन चौकार व एक षटकारासह २६ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर संघाच्या डावाची जबाबदारी स्वत:कडे घेत बोथा याने रॉस टेलरच्या साथीत संघाचा विजय दृष्टिपथात आणला. त्यांनी ३४ धावांची भर घातली. हीच जोडी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार असे वाटत असतानाच मुनाफ पटेल याने बोथाचा त्रिफळा उडविला. बोथा याने दोन चौकार व एक षटकारासह ४४ धावा केल्या. त्यानंतर टेलरने मणेरियाच्या साथीत संघाचा विजय पूर्ण केला. टेलरने नाबाद १३ धावा केल्या.
संक्षिप्त निकाल
मुंबई इंडियन्स :
२० षटकांत ८ बाद ९४ ( डेव्ही जेकब्ज १५, अंबाती रायडु ११, रोहित शर्मा १३, अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स १७, हरभजनसिंग नाबाद १०, जोहान बोथा ३/६, अशोक मणेरिया २/२०, अमितसिंग २/१४) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १८.१ षटकांत ३ बाद ९५ (शेन वॉटसन २६, जोहान बोथा ४४, मुनाफ पटेल २/१७)


solapur pune pravasi sangatana