राजस्थानचे अव्वल स्थानावर राज्य - पुणे वॉरियर्सवर सहा विकेट्सने मात, रॉस टेलर सामनावीर

जयपूर, १ मे/ वृत्तसंस्था
पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पुणे सहारा वॉरियर्सवर सहा विकेट्सनी मात करत राजस्थान रॉयल्सने अव्वल स्थानावर राज्य प्रस्थापित केले आहे. गोलंदाजांच्या तिखट माऱ्यापुढे पुण्याच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना १४३ धावा जमविता आल्या. पुण्याच्या १४४ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानला २० व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली असली तरी त्यांनी सलग दुसरा विजय नोंदवत अव्वल स्थान काबीज केले आहे. रॉस टेलरने नाबाद ४७ धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याच्या या दर्जेदार कामगिरीमुळेच त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न जेवढा जिगरबाज आहे तेवढाच तो चतुरही आहे, याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. नाणेफेक जिंकून त्याने येथील सिंथ खेळपट्टीवर प्रथम फलंदाजीसाठी पुण्याच्या संघाला आमंत्रित केले आणि त्याचा निर्णय योग्य असल्याचे संघातील गोलंदाजांनी दाखवून दिले. सिद्धार्थ त्रिवेदी याने दोन विकेट्स घेत पुण्याच्या संघाला वेसण घातले, तर वॉर्न, वॉटसन आणि बोथा यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्याला सुयोग्य साथ दिली. मुख्य गोष्ट म्हणजे या सर्वानीही अचूक मारा करत पुण्याच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. फलंदाजीत ‘प्रमोशन’ मिळालेल्या रॉबिन उथप्पा (३५) आणि मनीष पांडे (३०) यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हे दोघे बाद झाल्यावर पुण्याचा संघ पुन्हा एकदा गडगडला. कर्णधार युवराज सिंगनेही (७) यावेळी अपेक्षाभंगच केला. पण मिथून मन्हास (२४) आणि नॅथन मॅक्क्युलम (नाबाद ११) यांनी अखेरच्या षटकांमध्ये धावांची गती वाढविण्याचा प्रयत्न केला आणि पुण्याच्या संघाला २० षटकांत सात विकेट्सच्या मोबदल्यात १४३ धावा करता आल्या.
१४४ धावांचे आव्हान माफक वाटत असले तरी शेन वॉटसन (१२), राहुल द्रविड (१८) आणि योहान बोथा (१२) हे झटपट बद झाल्याने राजस्थानच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. राजस्थान आता पुण्याच्या गोलंदाजांच्या चक्रव्ह्य़ूहात अडकरणार असे वाटत असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेल्या रॉस टेलरने राजस्थानची ‘नैया’ पार लगावली. त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावत नाबाद ४७ धावा फटकावून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. टेलरला चांगली साथ देत असलेला अशोक मनेरीयाही (२९) यावेळी तंबूत दाखल झाला होता. राहुल शर्माने आपल्या लेग स्पिनच्या जोरावर फक्त १३ धावांत राजस्थानच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. अखेरच्या षटकांत सहा धावा हव्या असताना जेरोम टेलरच्या पहिल्या चेंडूवर टेलरने एक धाव घेतली. टेलर आता भेदक मारा करणार असे वाटत होते, पण युवा अजिंक्य रहाणेने टेलरच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला आणि राजस्थानला हायसे वाटले. त्यानंतरच्या चेंडूवर जास्त जोखीम न उठवता अजिंक्यने एकेरी धाव घेत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
पुणे वारियर्स-: २० षटकांत ७ बाद १४३ (रॉबिन उथप्पा ३५, मनीष पांडे ३०, सिद्धार्थ त्रिवेदी २८ धावांत २ बळी) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स-: १९.३ षटकांत ४ बाद १४४ (रॉस टेलर नाबाद ४७, राहुल शर्मा १३ धावांत ३ बळी) सामनावीर-: रॉस टेलर


solapur pune pravasi sangatana