वरुणराजाच्या कृपेने कोलकाताचा विजय

कोलकाता, ७ मे
कोलकाता नाइट रायडर्स संघावर शनिवारी वरुणराजाची कृपा झाली. पावसाने व्यत्यय आणलेल्या या लढतीत चेन्नई सुपर किंग्ज संघावर डकवर्थ- लुईस नियमाच्या आधारे कोलकाताने मात केली. कोलकाता संघापुढे विजयासाठी ११५ धावांचे किरकोळ आव्हान होते. हे आव्हान पार करण्याच्या दिशेने कोलकाताची वाटचाल चालू असताना पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. यावेळी कोलकाताची धावसंख्या होती १० षटकांत २ बाद ६१. पाऊस थांबण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याने अखेर डकवर्थ-लुईस नियमाचा आधार घेण्यात आला. १०व्या षटकाअखेर कोलकाता चेन्नईपेक्षा १० धावांनी आघाडीवर होता. याच सूत्राच्या आधारे कोलकाताला विजयी घोषित करण्यात आले.
यावेळी जॅक कॅलिस २१ धावांवर तर मनोज तिवारी १५ धावांवर खेळत होता. मॉर्गन ९ धावांवर तर कर्णधार गौतम गंभीर १८ धावांवर बाद झाले.
त्याआधी, कोलकाताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करीत चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत ५ बाद ११४ अशा मर्यादित धावसंख्येत रोखले. कोलकात्याच्या ब्रेट लीने चार षटकांत अवघ्या ८ धावा दिल्या. त्याला बळी मिळविण्यात यश आले नसले तरी त्याने चेन्नईच्या फलंदाजांना जखडून ठेवले.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय खेळपट्टीने आणि त्याच्या फलंदाजांनी साफ चुकीचा ठरवला. आघाडीवीर मुरली विजय याला इक्बाल अब्दुल्ला याने चौथ्या षटकात बाद करून चेन्नईला पहिला धक्का दिला. सहाव्या षटकात युसूफ पठाण याने सुरेश रैना याला बाद करून चेन्नईला दुसरा हादरा दिला. आघाडीवीर मायकेल हसी खेळपट्टीवर टिकून होता. मात्र त्याला वेगाने धावा जमवण्यात अपयश आले. ११ व्या षटकात हसी याला बालाजीने मॉर्गनकरवी झेलबाद केले. चेन्नईचे अर्धशतक फलकावर लागण्यासाठी १२ वे षटक उजडावे लागले. हसी बाद झाल्यावर बद्रीनाथ याने मॉर्केलच्या साह्य़ाने हळूहळू धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करून चेन्नईची धावसंख्या ११४ पर्यंत नेली. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर बद्रीनाथ धावबाद झाला. त्याने ४१ चेंडूत ५४ धावांची मौल्यवान खेळी केली. मॉर्केल याने ३० चेंडूत नाबाद ३० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ४ बाद ११४ (बद्रीनाथ ५४, मॉर्केल नाबाद ३०, इक्बाल अब्दुल्ला १५ धावांत १ बळी, युसूफ पठाण २५ धावांत १ बळी,) पराभूत वि. कोलकाता नाईट रायडर्स : १० षटकांत २ बाद ६१.  


solapur pune pravasi sangatana