विंडीजला जाणवतेय गेलची उणीव - सरवान

त्रिनिदाद  - ""वेस्ट इंडीजला धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेलची उणीव जाणवत आहे. पण, याविषयी आपण काहीच करू शकत नाही, याची जाणीव सर्व खेळाडूंना आहे,'' अशी प्रतिक्रिया विंडीजचा अनुभवी फलंदाज रामनरेश सरवान याने दिली. सोमवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने विंडीजला चार गडी राखून पराभूत केले. त्यानंतर सरवान बोलत होता.

गेल आणि वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळ यांच्यात सध्या वाद चालू आहे. यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी गेलला संघात स्थान देण्यात आले नाही. आयपीएलमध्ये बारा सामन्यांमध्ये 608 धावा करून जबरदस्त फॉर्म दाखविणाऱ्या गेलच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडीजला पहिल्या सामन्यात केवळ 214 धावांपर्यंतच मजल मारता आली होती.

सरवान म्हणाला, ""गेलसारख्या खेळाडूची उणीव संघाला कायमच जाणवते, हे मान्य करायलाच हवे; पण निवड समितीने जो संघ निवडला, त्यांच्यापुढेच चांगली कामगिरी करून दाखविण्याचे आव्हान आहे. असे असले, तरीही संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे आणि आगामी सामन्यांमध्ये त्याची प्रचिती येईलच.''
भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, युवराजसिंग या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्याने विंडीजविरुद्ध भारताचा तुलनेने अननुभवी संघ मैदानात उतरला आहे. पण, या नवोदित खेळाडूंची कामगिरी हा वेस्ट इंडीजसाठी एक धडाच आहे, असे मत सरवानने व्यक्त केले.

विंडीजच्या वरिष्ठ खेळाडूंपैकी एक असलेल्या सरवानचा स्वत:चा फॉर्मही उल्लेखनीय नाही. याविषयी तो म्हणाला, ""उपखंडातील विश्‍वकरंडक स्पर्धेपासून माझा फॉर्म हरपला आहे. अजूनही मी नेहमीसारखी फलंदाजी करू शकत नाही. तसेच, माझा स्ट्राइक रेटही कमी झाला आहे. माझ्या तंत्रामध्ये असलेल्या चुका दूर करण्यासाठी फलंदाजीचे प्रशिक्षक डेसमंड हेन्स यांच्याबरोबर काम करत आहे. जर मी एकेरी-दुहेरी धावा चटकन काढू शकलो, तर फलंदाजी आणखी चांगली होईल. भारताविरुद्ध 94 चेंडूत केलेल्या 56 धावांनी मला थोडा आत्मविश्‍वास आला आहे.''

शनिवारी झालेला एकमेव ट्‌वेंटी-20 सामना आणि पहिला एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघाने जोरदार विजयी सलामी दिली आहे. मात्र, ""या सामन्यांतून काही सकारात्मक गोष्टीही समोर आल्या आहेत. बरेच दिवस क्रिकेटपासून लांब राहिलेल्या मरलॉन सॅम्युअल्सने अर्धशतकी खेळी केली. देवेंद्र बिशूच्या कामगिरीत सातत्य आहे. ड्‌वेन ब्राव्हो कायम आत्मविश्‍वासाने खेळत असतो. उर्वरित सामन्यांत तो चांगली कामगिरी करेल,'' असा विश्‍वास सरवानने व्यक्त केला.

पाकिस्तानविरुद्धची कामगिरी विसरू नका
ट्‌वेंटी-20 सामना आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यात पराभव झाला असला, तरीही विंडीजला कमकुवत समजण्याची चूक करू नये, असा इशारा सरवानने दिला. तो म्हणाला, ""पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत आम्ही काय कामगिरी केली, हे विसरू नका. मालिका गमावल्यानंतरही शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांत आणि पहिल्या कसोटीमध्ये आम्ही पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला होता. आतापर्यंत अपेक्षित सलामी मिळालेली नाही; पण अजून चार सामने उरले आहेत. एका पराभवामुळे आम्ही खचून गेलेलो नाही.''


solapur pune pravasi sangatana