विजयपथावर येण्यासाठी चेन्नईपुढे पुण्याचे आव्हान!

चेन्नई, २४ एप्रिल
लागोपाठ दोन पराभवांच्या धक्क्यातून पुन्हा विजयपथावर येण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्ज संघ उत्सुक असला तरी त्यांना आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आव्हान राखण्यासाठी पुणे वॉरियर्सशी उद्या येथे चारहात करावे लागणार आहे. विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वाखाली उतरलेला चेन्नई संघ साखळी गटात शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यांमध्ये चेन्नई संघाने तीन सामने गमावले आहेत. उद्याच्या सामन्याखेरीज त्यांना आणखी आठ सामने खेळावयाचे आहेत. गतवर्षीही सुरुवातीच्या खराब कामगिरीमुळे साखळी गटातच आव्हान संपुष्टात येण्याची वेळ त्यांच्यावर आली होती, तथापि त्यांनी शेवटच्या टप्प्यातील सामन्यांमध्ये स्पृहणीय कामगिरी करीत कलाटणी दिली होती.
यंदा कोलकाता नाईट रायडर्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध विजय मिळविल्यानंतर त्यांना कोची टस्कर्स, मुंबई इंडियन्स, किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्याविरुद्धचे सामने गमवावे लागले होते. तीन सामने गमावले असले तरी चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेिमग हे संघाच्या व्यूहरचनेशी चिकटून आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महेंद्रसिंह धोनी, मायकेल हसी, सुरेश रैना, अनिरुद्ध श्रीकांत यांच्यावरच ते फलंदाजीची मदार ठेवून आहेत. मात्र या संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत ठरली आहे. त्यांच्याकडून खेळणारा श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज सूरज रणदीव याला अद्याप सूर गवसला नाही. त्याने चार सामन्यांमध्ये केवळ पाच बळी मिळविले आहेत. त्याची गोलंदाजी महागडीच ठरली आहे. त्याचा सहकारी रविचंद्रन अश्विन यालाही फारसे यश मिळवता आलेले नाही. पाच सामन्यांमध्ये त्याने केवळ चार गडी बाद केले असून, त्यासाठी त्याला १४३ धावा मोजाव्या लागल्या आहेत.
पुणे वॉरियर्सने लागोपाठ दोन सामने गमावले आहेत. त्यांच्या फलंदाजीची मदार प्रामुख्याने कर्णधार युवराजसिंग व जेसी रायडर या आक्रमक फलंदाजांवर राहिली आहे. हे दोन फलंदाज अपयशी ठरल्यामुळेच त्यांना गेल्या दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना त्यांनी गमावला असला तरी त्यांच्या रॉबिन उथप्पा याला सूर गवसला ही त्यांच्यासाठी आत्मविश्वास उंचावणारी गोष्ट आहे. गोलंदाजीत कोणीही दिग्गज गोलंदाज नाही हाच कमकुवतपणा पुणे वॉरियर्सला जाणवत आहे. विशेषत: सामन्यास कलाटणी देण्याची क्षमता असलेला गोलंदाज त्यांच्याकडे नाही. त्यांचा वेन पार्नेल हा जरी किफायतशीर गोलंदाज ठरला असला तरी बळी मिळविण्यात त्याला फारसे यश मिळालेले नाही.   

प्रतिस्पर्धी  संघ पुढील प्रमाणे
चेन्नई सुपरकिंग्ज- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मुरली विजय, सुरेश रैना, एस. बद्रिनाथ, रविचंद्रन अश्विन, शादाब जकाती, मायकेल हसी, अल्बी मोर्कल, बेन हिल्फेनहॉस, डग बोलिंगर, जी.बॅली, टिम साऊथी, फादू प्लेसिस, सूरज रणदीव, नुवान कुलसेकरा, जोगिंदर शर्मा, वाय. महेश, ए. मुकुंद, रिद्धिमन साह, स्कॉट स्टायरिस, सुदीप त्यागी, के. वासुदेवदास, जी. विग्नेश.
पुणे वॉरियर्स- युवराजसिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मुरली कार्तिक, अभिषेक झुनझुनवाला, भुवनेश्वरकुमार, धीरज जाधव, एकलव्य द्विवेदी, गणेश गायकवाड, हरप्रीतसिंग भाटिया, हर्षद खडीवाले, कामरान खान, मोहनीश मिश्रा, मिथुन मन्हास, राहुल शर्मा, सचिन राणा, श्रीकांत वाघ, श्रीकांत मुंढे, इम्तियाज अहमद, ग्रॅमी स्मिथ, जेसी रायडर, वेन पार्नेल, अल्फान्सो थॉमस, कॅलुम फग्र्युसन, मिशेल मार्श, जेरोमी टेलर.  


solapur pune pravasi sangatana