वीरूचा झंझावात; डेक्कन सपाट - दिल्लीचा चार विकेट्सनी विजय

हैदराबाद, ५ मे
५६ चेंडू..  १३ चौकार .. तब्बल खणखणीत सहा षटकार आणि ११९ धावा.. असा दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवागचा झंझावात साऱ्यांनीच अनुभवला आणि त्यांच्या या झंझावातापुढे डेक्कन चार्जर्सचा संघ सपाट झाला. सेहवाग नावाचे वादळ एकदा घोंघावायला लागले तर त्याला थांबविणे कोणच्याच बस की बात नसते आणि त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. डेक्कन चार्जर्सला त्याच्यापुढे लोटांगण घालण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. डेक्कनचे १७५ धावांचे आव्हान दिल्लीचा संघ कसा गाठणार, अशा चर्चाना उत आला होता. पण सेहवागपुढे कोणी काहीही बोलू शकलेच नाही. त्याच्या या वादळी शतकी खेळीच्या जोरावरच दिल्लीला डेक्कनला चार विकेट्सने पराभूत करता आले आणि सामनावीराच्या पुरस्काराबरोबरच ‘ऑरेंज कॅप’चा मानकरी ठरला अर्थातच सेहवाग.
१७५ धावांचे आव्हान घेऊन दिल्लीचा संघ मैदानात उतरला तेव्हा साऱ्यांच्याच नजरा फक्त आणि फक्त सेहवागवरच होत्या. त्याच्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती करत त्याने दिल्लीला एकहाती विजय मिळवून दिला. दिल्लीची सुरूवात चांगली झाली नव्हती, त्यांची ३ बाद २५ अशी अवस्था होती. पण परीस्थितीकडे नुसते पाहत बसायचे नसते, तिच्यावर मात करायची असते, हेच सेहवागने दाखवून दिले. इशांत शर्मा आणि डेल स्टेन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स काढत दिल्लीवर दबाव बनवला होता. पण शहाणपणा दाखवत सेहवागने या दोघांची गोलंदाजी सावधपणे खेळून काढत अन्य गोलंदाजांवर तुफानी हल्ला चढवला. इशान मल्होत्राच्या  एका षटकात त्याने २३ धावा लूटल्या. तर भरत चिपलीच्या एका षटकात २० धावा वसूल केल्या. सेहवागपुढे डेक्कनच्या गोलंदाजांबरोबरच कर्णधार कुमार संगकाराही हतबल झाला होता.
सेहवाग बाद झाल्यावर जेम्प होप्सने १० चेंडूत नाबाद १७ धावा फटकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रथम फलंदाजी करताना डेक्कनकडून डय़ुमिनीने ३१ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५५ धावा फटकाविल्या. तर दुसऱ्या टोकाकडून त्याला संगकाराची (४४) चांगली साथ मिळाल्याने डेक्कनला १७५ धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
डेक्कन चार्जर्स-:
२० षटकांत ५ बाद १७५ (जे. पी. डय़ुमिनी ५५, कुमार संगकारा ४४, अजित आगरकर २९ धावांत २ बळी) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स -: १९ षटकांत ६ बाद १७९ (वीरेंद्र सेहवाग ११९, इशांत शर्मा १६ धावांत २ बळी).
सामनावीर-: वीरेंद्र सेहवाग.


solapur pune pravasi sangatana