वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी युवा खेळाडूंच्या नावाची चर्चा

चेन्नई, १२ मे
तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागला झालेली खांद्याची दुखापत, मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान यांना वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विश्रांती देण्याचा सल्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतला असल्याने अंबाती रायडू, रोहित शर्मा, एस. बद्रीनाथ, इशांत शर्मा, प्रवीण कुमार, राहुल शर्मा, पॉल वल्थाटी, मनोज तिवारी, इक्बाल अब्दुल्ला या आयपीएलमध्ये चमकलेल्या युवा खेळाडूंना भारतीय संघातून खेळण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. शुक्रवारी निवड समिती अध्यक्ष के. श्रीकांत, नवनिर्वाचित प्रशिक्षक डंकन फ्लेचर आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यामध्ये येथे बैठक होणार असून या बैठकींमध्येच वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी संघ निवडण्यात येईल. वेस्ट इंडिजचा दौरा ४ जूनपासून सुरू होणार असून या दौऱ्यात भारतीय संघ एक ट्वेन्टी-२० सामना आणि एकदिवसीय व कसोटी मालिका खेळणार आहे.
वीरेंद्र सेहवागला खांद्याच्या दुखापतीवर लंडनला जाऊन शस्त्रक्रिया करायची असल्याने तो सहा आठवडे तरी क्रिकेटपासून लांब राहणार आहे. त्याचबरोबर सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांना विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे. कर्णधार महेंद्रसिंग धोनीही या दौऱ्यातील काही सामन्यांमध्ये विश्रांती घेणार असून त्यावेळी सलामीवीर गौतम गंभीर कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. धोनी जेव्हा विश्रांती घेईल तेव्हा अंबाती रायडू या युवा खेळाडूला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण मुंबई इंडियन्सकडून खेळताना रायडूने एक फलंदाज आणि एक यष्टीरक्षक म्हणून चमकदार कामगिरी केलेली आहे, त्यामुळे धोनीला रायडू हा चांगला पर्याय ठरू शकतो, असे बऱ्याच जणांना वाटते. अंबाती हा एक चांगला फलंदाज तर आहेच, पण त्यापेक्षा तो चांगले यष्टीरक्षण करू शकतो आणि हीच त्याच्यासाठी जमेची बाजू आहे. सध्या रॉबिन उथप्पा चांगली कामगिरी करताना दिसत नाही. त्यामुळे रायडूला यावेळी पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. या दौऱ्यात धोनी विश्रांती घेण्याची शक्यता आहे आणि जर त्याने विश्रांती घेतली नाही तर संघात दुसरा यष्टीरक्षक असायला हवा, असा निवड समितीतील काही जणांचा विचार आहे. त्यामुळे ट्वेन्टी-२० किंवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये अंबातीला भारतातर्फे क्रिकेट खेळण्याची चांगली संधी असेल, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने सांगितले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये शतक झळकाविलेल्या पॉल व्हल्थाटी, कोलकाता नाइट रायडर्समधील मनोज तिवारी आणि मुंबईचा युवा फिरकीपटू इक्बाल अब्दुल्ला यांचीही नावे चर्चेत येण्याची शक्यता आहे.
यंदाच्या रणजी स्पर्धेत एस. बद्रीनाथ कमालीचा फॉर्मात होता. त्याने १३१ च्या सरासरीने ९२२ धावा फटकाविल्या होत्या. तर यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने १३५ च्या स्ट्राईक रेटने २९४ धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळताना त्याच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळली आहे.
बंगालचा कर्णधार मनोज तिवारी यानेही यंदाच्या आयपीएलमध्ये २७७ धावा फटकाविल्या आहेत. तर मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या रोहित शर्माला संघाचे दार पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता आहे.  आशिष नेहरा दुखापतग्रस्त झाल्याने प्रवीण कुमारला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पण कोचीच्या संघाविरुद्ध इशांत शर्माने काढलेल्या पाच विकेट्स अजूनही साऱ्यांच्याच स्मरणात असल्याने या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळेल. फिरकीपटूंमध्ये हरभजन सिंग, आर. अश्विन आणि विश्वचषकाच्या संघातील ‘लकी’ खेळाडू या नात्याने पीयूष चावलालाही संधी मिळू शकते. विश्वचषकात आणि आयपीएलमध्येही चावला आपली छाप पाडण्यात अपयशी ठरलेला आहे. पण चावलाऐवजी राहुल शर्माला यावेळी संधी देण्यास काहीही हरकत नाही. कारण आतापर्यंत आयपीएलमधील त्याची कामगिरी निवड समितीच्या डोळ्यात भरेल, अशीच झालेली आहे. त्याचबरोबर जर डावखुऱ्या फिरकीपटूचा विचार झाल्यास. प्रग्यान ओझा आणि इक्बाल अब्दुल्ला ही दोन नावे प्रामुख्याने पुढे येत आहे. ओझाला आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. तर इक्बाल अब्दुल्लाने मुंबईकडून रणजी स्पर्धेत आणि सध्या आयपीएलमध्येही चमकदार कामगिरी केलेली आहे. अब्दुल्लाने आतापर्यंतच्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये ६.१० च्या सरासरीने १३ विकेट्स पटकाविल्या असल्याने त्याच्या नावाचा विचारही यावेळी केला जाईल.


solapur pune pravasi sangatana