वॉर्नचा आयपीएलला अलविदा

नवी दिल्ली, ६ मे
आपल्या जादुई फिरकीच्या जोरावर नावाजलेल्या फलंदाजांना नाचवणारा आणि आयपीएलमध्ये नवख्या खेळाडूंना घेऊन विजयाचा एव्हरेस्ट सर करणाऱ्या जिगरबाज शेन वॉर्नने अखेर स्पर्धेला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाची आयपीएल ही वॉर्नची शेवटी स्पर्धा असून राजस्थानचा संघ त्याला विजयाने निरोप देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
४१ वर्षीय वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर त्याच्या फिरकीची जादू आयपीएलच्या निमित्ताने सर्वाना पाहायला मिळाली. युवा खेळाडूंना सोबत घेऊन त्याने संघाची मोट बांधली आणि आपल्या चाणाक्ष नेतृत्वाने राजस्थानला पहिली आयपीएल स्पर्धा जिंकवून दिली. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये वॉर्न मैदानात दिसणार नसला तरी संघाला मार्गदर्शन करायला तो राजस्थानच्या संघाबरोबर असणार आहे.
होय, एक खेळाडू म्हणून ही माझी अखेरची स्पर्धा असणार आहे. त्यामुळे मैदानात या आणि राजस्थानच्या संघाला अखेरच्या दोन सामन्यांसाठी पाठिंबा द्या. तुमच्या पाठिंब्याची आम्हाला नितांत गरज आहे, असे भावनिक आवाहन वॉर्नने प्रेक्षकांना केले आहे.
२००५ साली वॉर्नने एकदिवसीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता, तर २००७ साली त्याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला. त्याने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कसोटी सामन्यांमध्ये ७०८ आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३ विकेट्स पटकाविल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडल्यानंतर गेल्या चार वर्षांपासून वॉर्न आयपीएलमध्ये खेळतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडले असले तरी तो अजूनही फिट कसा काय राहू शकतो, हा प्रश्न साऱ्यांनाच पडलेला आहे.
पुढच्या वर्षी काय होईल हे सांगता येणार नाही. पुढच्या वर्षी राजस्थानच्या संघात मी असलो तर प्रशिक्षकाच्या किंवा मार्गदर्शकाच्या भूमिकेत मी असेन. राजस्थान रॉयल्स संघासाठी चांगले काय करता येईल, हाच विचार माझ्या मनात आहे. संघातील खेळाडूंनी जो मला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तुमच्या सहकार्यामुळेच मी क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटू शकलो. माझ्यासाठी तुम्हीच सर्वोत्तम आहात, असे वॉर्न म्हणाला.
मैदानाबाहेरही वॉर्नने बरेच सामने गाजवले. सध्या अभिनेत्री एलिझाबेथ हर्लेबरोबरचे त्याचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजत असले तरी या गोष्टींचा त्याच्या कामगिरीवर तसूभरही परिणाम झाला नाही. आयपीएलमधील ५२ सामन्यांमध्ये त्याने २४.६६ च्या सरासरीने ५६ विकेट्स काढल्या
आहेत. आयपीएलच्या पहिल्या वर्षी विजेतेपद जिंकणाऱ्या संघामध्ये जसे वातावरण होते अगदी तसेच आतादेखील आहे. संघ़ातील युवा खेळाडूंनी ज्यापद्धतीने प्रगती केली आहे ते पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो, असेही वॉर्न म्हणाला
.


solapur pune pravasi sangatana