सचिनची शाबासकी लाख मोलाची- व्हल्थाटी

नवी दिल्ली, १८ मे
एखाद्याला आपण लहानपणापासून पाहत असतो.. त्याच्या कलेवर, खेळावर आपण खूष होतो.. त्याच्याकडून बरेच काही एकलव्यासारखे शिकत असतो.. त्याला आपले दैवत किंवा आदर्श मानू लागतो.. आयुष्यात एकदातरी त्याला त्याला जवळून पाहावं.. त्याच्याशी बोलण्याची संधी मिळावी, असंच मनोमन वाटत असतं.. नशीब बलवत्तर असेल तर ती व्यक्ती आपल्याला भेटतेही.. तो क्षण आयुष्यातला सुवर्णक्षण असतो.. एखाद्या मोरपिसासारखा आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा.. त्याच्या या भेटीत त्याची शाबासकी मिळली तरी तर गगनही मग ठेंगणे होते.. अशीच काहीशी अवस्था झाली आहे ती पॉल व्हल्थाटीची. सचिन त्याचा आदर्श. मुंबईतील आयपीएलच्या सामन्यानंतर सचिन व्हल्थाटीला भेटला आणि त्याला सध्याच्या कामगिरीबद्दल शाबासकी दिली. सचिनची ही शाबासकी माझ्यासाठी लाखमोलाची असल्याचे व्हल्थाटीने म्हटले आहे.
‘ऑरेंज कॅप’ कोणीही पटकावू दे. माझ्या सध्याच्या कामगिरीवर मी जाम खूष आहे, कारण या कामगिरीचे कौतुक केले आहे ते दस्तुरखुद्द सचिनने, ज्याला मी आदर्श मानत आलोय. सचिनकडून मिळालेल्या शाबासकीसारखा दुसरा सन्मान कोणताच नाही, असे व्हल्थाटीने म्हटले आहे.
तो पुढे म्हणाला की, सचिन आणि मॅथ्यू हेडन हे माझे आदर्श. या दोघांकडून मी बरेच काही शिकलोय. मुंबईतील एका सामन्यानंतर सचिन मला भेटला आणि त्याने माझ्या सध्याच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल कौतुक केले. तो क्षण मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. माझ्या कारकीर्दीतला तो सर्वोच्च पुरस्कार आहे.
आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात शतक झळकाविल्यावर व्हल्थाटी प्रकाश झोतात आला. सध्या त्याच्या नावावर १३ सामन्यांमध्ये ४५८ धावा आहेत. तर त्याचा संघसहकारी शॉन मार्शच्या खात्यात ४९१ धावा आहेत.    


solapur pune pravasi sangatana