सचिनला वाढदिवसाची भेट! मुंबईच सुपर!

रोहितचे धुवाँधार अर्धशतक हरभजनचे १८ धावांत ५ बळी

मुंबई, २२ एप्रिल
गेल्या आयपीएलच्या अंतिम फेरीतील पराभवाची सव्याज परतफेड आज मुंबई इंडियन्सने करत आम्हीच ‘सुपर’ असल्याचे दाखवून दिले. रोहित शर्माच्या तडाखेबंद ८७ धावा, हरभजन सिंगच्या पाच विकेट्स आणि किरॉन पोलार्डचे अप्रतिम क्षेत्ररक्षण यामुळे तिन्हीही आघाडय़ांवर मुंबईचा संघ अव्वल ठरला. याशिवाय गुणतालिकेतही मुंबई इंडियन्सने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना १६४ धावा केल्या. मग हरभजनसह मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची सुरेख साथ लाभल्याने मुंबईने चेन्नईला ८ धावांनी पराभूत करत कर्णधार सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या दोन दिवसांपूर्वीच विजयाची छानशी भेट दिली. फक्त १८ धावांमध्ये चेन्नईचा अर्धा संघ तंबूत धाडणाऱ्या हरभजनला यावेळी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मुंबईच्या १६५ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर मुरली विजय (१२) आणि सुरेश रैना (५) हे दोघेही झटपट बाद झाले असले तरी सलामीवीर मायकेल हसी (४१) आणि एस. बद्रीनाथ (नाबाद ७१) यांनी संघाला सावरून सामन्यामध्ये परतवण्याचे काम चोख बजावले. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ६० धावांची रचली, हे दोघे संघाला विजय मिळवून देणार असे वाटत असतानाच मलिंगाच्या चेंडूवर पोलार्डने हसीचा अप्रतिम झेल पकडत ही जोडी फोडली. हसी बाद झाल्यावर मुंबईचा संघ कमालीचा ‘चार्ज’ झाला. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कमालीचा उत्साह संचारला. हरभजनने पाच विकेट्स घेत चेन्नईच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. १८ व्या षटकांत हरभजनने तीन विकेट्स घेत सामना मुंबईच्या बाजूने झुकवला. एका बाजूला उभा असलेल्या बद्रीनाथाला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही.
तत्पूर्वी, ‘गुड फ्रायडे’च्या सुट्टीच्या दिवशी मुंबई इंडियन्सचा कर्णधार आणि क्रिकेटरसिकांच्या गळ्यातली ताईत असलेल्या सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहण्यासाठी आज प्रेक्षकांनी गर्दी केली होती. पण सचिनने(५) साफ निराशा केली असली तरी मुंबईकर रोहित शर्माने मात्र झंझावाती फलंदाजी केली आणि त्याच्या अर्धशतकी खेळीचा आनंद प्रेक्षकांनी लुटला. त्याने अंबाती रायडू (२७) आणि अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स (नाबाद ३१) यांच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. चेन्नईच्या गोलंदाजांवर आज रोहित भारी पडला.
पहिल्या दोन विकेट्स फक्त १३ धावांमध्ये गेल्यावर रोहित मैदानात आला आणि त्याच्या फलंदाजीमुळे चेन्नईचे मुंबईला कमीत कमी धावांत बाद करण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. आतापर्यंतच्या सामन्यात रोहितला फलंदाजीची जास्त संधी मिळाली नव्हती, पण आज मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. रोहितने आठ चौकार आणि खणखणीत पाच षटकार वसूल करत ४८ चेंडूत ८७ धावा फटकाविल्या. पंधराव्या षटकात मुंबईची ३ बाद १०७ अशी अवस्था होती. पण त्यानंतर रोहित आणि सायमंड्स यांनी चेन्नईच्या गोलंदाजांवर तुटून पडत पाच षटकांत ५७ धावा वसूल केल्या. जोगिंदर शर्माचे १६वे षटक यावेळी सर्वात महागडे ठरले. त्याच्या या षटकात दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने या दोघांनी १७ धावा लुटल्या. या दोघांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर मुंबईला २० षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात १६४ धावा करता आल्या.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स :
२० षटकांत ४ बाद १६४ (रोहित शर्मा ८७, अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स नाबाद ३१, डग बोलिंगर २/३०) विजयी वि. चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ९ बाद १५६ (एस. बद्रीनाथ नाबाद ७१, मायकेल हसी ४१, हरभजन सिंह ५/१८). सामनावीर : हरभजन सिंग.


solapur pune pravasi sangatana