सचिनला वाढदिवसाची विजयी भेट

मुंबईचा डेक्कन चार्जर्सवर ३७ धावांनी विजय
हैदराबाद, २४ एप्रिल

३८ व्या वाढदिवशी मुंबई इंडियन्सचा कर्णधार सचिन तेंडुलकरला ‘बर्थ डे ब्लास्ट’ करता आला नसला तरी संघाने मात्र त्याला विजयाची भेट दिली. रोहित शर्मा आणि अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स यांनी मुंबईला डेक्कन चार्जर्सच्या फिरकीच्या जाळ्यातून बाहेर काढत पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली आणि त्यामुळे संघाला १७२ धावा उभारता आल्या. डेक्कनच्या संघाचे वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने फक्त ९ धावांमध्ये तीन बळी घेत कंबरडे मोडले. क्षेत्ररक्षकांनीही आज जीव लावून क्षेत्ररक्षण केल्यामुळे तिन्हीही आघाडय़ांवर मुंबईचा संघ सरस ठरला आणि त्यामुळेच डेक्कनवर मुंबईने ३७ धावांनी सहज मिळवित विजयी हॅट्ट्रिक पूर्ण केली. नऊ धावांमध्ये तीन विकेट्स घेत आपल्या गोलंदाजीची छाप पाडणाऱ्या लसिथ मलिंगाला यावेळी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१७२ धावांचे आव्हान फारसे मोठे वाटत नसले तरी भेदक गोलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबईने डेक्कनवर मात केली. लसिथ मलिंगा आज पुन्हा एकदा प्रतिस्पध्र्यावर भारी पडला. शिखर धवन (२५), कर्णधार कुमार संगकारा (३४) या दोन्हीही स्थिरस्थावर झालेल्या फलंदाजांबरोबरच रवी तेजाला (२१) तंबूत पाठवत डेक्कनचा बार फुसका असल्याचे दाखवून दिले. यावेळी त्याने तीन विकेट्स या वेळी पटकाविल्या, त्या फक्त ९ धावांमध्येच.
 मुंबईच्या क्षेत्ररक्षकांनीही यावेळी अप्रतिम कामगिरीचा नजराणा पेश करत तीन फलंदाजांना धावबाद करुन तंबूचा रस्ता दाखवला. सचिननेही यावेळी गोलंदाजांचा चांगला वापर करत, डेक्कनच्या फलंदाजांना जास्त काळ स्थिरस्थावर होण्याची संधी दिली नाही.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून डेक्कनने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि काही काळापर्यंत त्यांचा हा निर्णय योग्य असल्याचे वाटत होते. पण रोहित आणि सायमंड्स यांनी डेक्कनच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ले चढवत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन दिली.
डेव्हि जेकब्स आणि सचिन (२४) या दोघांनाही संघाला चांगली सुरुवात करून दिली. डेकब्सने यावेळी २० चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३२ धावांची खेळी साकारली. जेकब्स बाद झाल्यावर सचिनने सामन्याची सूत्रे हातात घेतली आणि आपल्या ३८ व्या वाढदिवशी सचिन ‘बर्थ डे ब्लास्ट’ करणार असे साऱ्यांनाच वाटत होते, पण त्याने यावेळी निराशाच केली.
 हे दोघे बाद झाल्यावर अंबाती रायडू (७) आणि फलंदाजीची जास्त संधी न मिळालेला किरोन पोलार्ड (०) हे दोघेही झटपट बाद झाले.
यावेळी प्रग्यान ओझा आणि अमित मिश्रा या दोघांनी मिळून मुंबईचे तीन फलंदाज बाद करत त्यांची ४ बाद ७० अशी अवस्था केली होती. या वेळी डेक्कनच्या फिरकीच्या चक्रव्ह्य़ूहात मुंबईचा संघ अडकणार असे वाटत होते, पण चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात संघाला सावरणारे रोहित आणि सायमंड्स पुन्हा एकदा संघासाठी धावून आले.
 या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. रोहितने या वेळी ३४ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५६ धावा फटकाविल्या, तर सायमंड्सने चार चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावांची खेळी साकारून त्याला चांगली साथ दिली.    

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स-
: २० षटकांत ४ बाद १७२
(रोहित शर्मा नाबाद ५६, अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स नाबाद ४४, अमित मिश्रा १४ धावांत २ बळी) विजयी वि.
डेक्कन चार्जर्स -: २० षटकांत ८ बाद १३५
(कुमार संगकारा ३४, लसिथ मलिंगा ९ धावांत ३ बळी, किरोन पोलार्ड २० धावांत १ बळी)
सामनावीर -: लसिथ मलिंगा.  
 


solapur pune pravasi sangatana