सानिया फ्रेंच ओपनच्या दुहेरी अंतिम फेरीत

पॅरिस, २ जून/पी.टी.आय.
भारताची स्टार खेळाडू सानिया मिर्झा हिने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आपली रशियाई जोडीदार एलेना व्हेसनिना हिच्या साथीने तिने लिझेल हबर आणि लिसा रेमण्ड या जोडीला थरारक सामन्यात ६-३, २-६, ६-४ असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली.
सानिया - व्हेसनिना या जोडीला या स्पर्धेत सातवे मानांकन मिळाले आहे. काल रोलँड गॅरोवर त्यांची गाठ चौथ्या सिडेड लिझेल-लिसा या जोडीशी पडली. १०५ मिनिटे चाललेल्या या चुरशीच्या झुंजीत अखेर सानिया- व्हेसनिनाने बाजी मारली. अंतिम फेरीत आता त्यांची बिनसिडेड अँड्रिया हल्व्हाकोव्हा आणि ल्युसी ऱ्हाडेका या झेकोस्लाव्हाकियाच्या जोडीशी गाठ पडणार आहे. या जोडीने अंतिम फेरीत प्रवेश करताना तिसऱ्या सिडेड वानिया किंग आणि यारोस्लावा श्वेडोव्हा या जोडीला पराभूत केले होते.
या विजयामुळे सानिया मिर्झा आपल्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. या आधी दोन वेळा ती ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत पोहोचली होती. त्यापैकी २००९ साली भारताच्याच महेश भूपतीबरोबर तिने ही स्पर्धा जिंकली होती. तर त्या आधीच्या वर्षी ही जोडी उपविजेती ठरली होती.
कालच्या सामन्यात खेळताना सानियाने आपल्या डाव्या गुडघ्याखाली एक पट्टी बांधली होती. परंतु सामना खेळताना तिला काही वेदना होत असल्याचे जाणवले नाही. कोर्टवरील तिचा वावर अगदी सहज आणि विजयी आवेशात होता.
सानिया- व्हेसनिना जोडीने प्रतिस्पर्धी जोडीला पहिल्याच सेटमध्ये ४-१ असे पिछाडीवर टाकले. पाठोपाठ अवघ्या ३० मिनिटांत हा सेट ६-३ असा खिशात टाकला. दुसरा सेट मात्र चुरशीचा झाला. दोन्ही जोडय़ांनी परस्परांच्या सव्‍‌र्हिस ब्रेक करीत दबाव आणला. मात्र सानिया-व्हेसनिना यांची सव्‍‌र्हिस तीन वेळा ब्रेक झाल्याने अखेर त्यांना हा सेट २-६ असा गमवावा लागला. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये मात्र सानिया-व्हेसनिना दुसऱ्या सेटमधील चुकांची पुनरावृत्ती होऊ दिली नाही. पहिल्याच गेममध्ये त्यांनी लिझेल-लिसा जोडीची सव्‍‌र्हिस ब्रेक केली आणि आपली सव्‍‌र्हिस राखत २-० अशी आघाडी घेतली. तिसरा गेम पुन्हा लिझेल-लिसा या जोडीने घेतला परंतु सानिया-व्हेसनिनाने सुद्धा आपली सव्‍‌र्हिस राखत २ गेमची आघाडी कायम राखली. त्यानंतर मात्र लिझेल-लिसा जोडीने सानिया - व्हेसनिनाची सव्‍‌र्हिस भेदत ३-३ अशी बरोबरी साधली. त्यावेळी सामना अतिशय चुरशीचा होण्याची चिन्हे दिसत होती. परंतु सानिया-व्हेसनिनाने पुन्हा एकदा उसळी घेत आपली सव्‍‌र्हिस राखली आणि पाठोपाठ प्रतिस्पर्धी जोडीची सव्‍‌र्हिस भेदली आणि सामन्यावर वर्चस्व मिळविले. ३७ मिनिटांच्या झुंजीनंतर तिसरा सेट त्यांनी ६-४ असाजिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली.
सानिया आणि व्हेसनिना या दोघींनी यंदाच्या फेब्रुवारीपासूनच एकत्र खेळण्यास सुरुवात केली आहे. या दोघींनी आतापर्यंत दोन स्पर्धा जिंकल्या आहेत. भारताच्या रोहन बोपण्णाला काल पुरुष दुहेरीत उपउपान्त्य सामन्यात हार पत्करावी लागल्यानंतर सानिया मिर्झा ही एकमेव भारतीय खेळाडू या स्पर्धेत राहिली असून स्वाभाविकच तिच्यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.


solapur pune pravasi sangatana