किल्ले रामसेज

‘किल्ले रामसेज’ गुलशनाबादेपासून (नाशिक) चार कोसावर उभा होता. किल्ला कसला एखादी छोटीशी टेकडीच. रायगड, राजगडसमोर रामसेज तर अगदी लिंबूटिंबूच. किल्ल्यावर तोफा, दारूगोळा, बंदुका, प्रचंड खजिना नव्हता. मग काय होतं? किल्ले रामसेजचा अनाम किल्लेदार (या किल्लेदाराचं नाव दुर्दैवाने इतिहासाला माहीत नाही) छत्रपती शिवाजी-संभाजी महाराजांचा मरहट्टा नाईक आणि भगव्याचा निष्ठावंत पाईक आणि त्याची मूठभर मराठी सेना. रामसेजच्या किल्लेदारांनी आपल्या सेनेत स्वाभिमानाचा अंगार पेटवला. तो आपल्या सेनेस उद्देशून म्हणाला, ‘‘गड्यांनो, थोरलं राजं हयात नाहीत. रायगडावर त्याचा अंश संभूराजे हायती. त्यांच्या आदेशानुसार किल्ला जुझवायचाच. अवरंगजेबाला मराठी मातीचा हिसका दावायचा...घ्या सप्तशृंगीचे नाव...हर हर महाऽऽदेव!’’ कितीतरी वेळ किल्ल्यावर हर हर महादेवची गर्जना घुमत राहिली.
शहाबुद्दीनच्या नेतृत्वाखाली मुघल सैन्य किल्ला चढू लागले. किल्ल्यावरून प्रतिकाराची कोणतीच हालचाल दिसून येत नव्हती. मुघल मराठे घाबरले या आनंदात ते किल्ला चढू लागले. अर्धाधिक किल्ला चढून गेल्यावर मुघल सैन्याला गडगडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. त्यांनी वर पाहिले तर काळ्याकभिन्न शिळा किल्ल्यावरून खाली झेपावत होत्या. मुघली सैन्याचा चुराडा करीत शिळा खाली झेपावू लागल्या. किल्ल्याच्या तळात मुघली सैन्याच्या प्रेतांचा खच पडू लागला. शहाबुद्दीन आश्‍चर्यचकित झाला आणि किल्ल्यावर पहिल्या विजयाचा जयघोष घुमला. किल्ले रामसेजवर मुगली तोफखाना धडाडू लागला, पण किल्लेदाराला त्याची पर्वा नव्हती. कारण त्यांनी किल्ले रामसेजच्या भोवती एक अदृश्य लक्ष्मणरेषा आखली होती. जो कोणी ती ओलांडायचा प्रयत्न करी त्यास दगडधोंड्याचा प्रसाद मिळत होता. संभाजीराजांनी किल्ले रामसेजवर रसद पोहोचवली. किल्लेदारांचा आणि मावळ्यांचा हुरूप वाढला. औरंगजेबाने शहाबुद्दीन, बहादूर कोकलताश आणि कासिमखान किरमाणी असे सरदार बदलून बघितले, पण रामसेज हार जात नव्हता. बहादूरखानाने तर 100 तोळे वजनाचा सोन्याचा सापही भुतांना वश करण्यासाठी आणि मुघलांना विजय मिळावा म्हणून वापरला. पण मराठी भुतांनी त्यास दाद दिली नाही. रामसेजसारखा लिंबू-टिंबू किल्ला एक नव्हे दोन नव्हे, तर साडेपाच वर्षं औरंग्याला झुंजवत होता. शेवटी रसद संपल्यामुळे त्या बहाद्दर किल्लेदाराने पन्नास हजार रुपयांच्या मोबदल्यात किल्ला अब्दुल करीमच्या ताब्यात दिला. औरंगजेबाला ही सुवार्ता कळविण्यात आली. त्याने किल्ल्याचे नामकरण केले, ‘रहिमगड.’
रामसेजचा किल्लेदार उदास मनाने पन्नास हजारांची थैली घेऊन रायगडावर आला. संभाजीराजांनी त्याची सर्फराजी केली. ‘‘आबासाहेबांच्या शब्दांप्रमाणे किल्ला लढविलात. भले शाब्बास! आता अजून एक कामगिरी, औरंगजेब रामसेज सजवतोय. तटा-बुरुजांनी सजवू द्या! एकदा का रामसेज सजला की पुन्हा आणाल स्वराज्यात!’’ रामसेजचा किल्लेदार आनंदाने थरारला. थोडे दिवस रायगडावर मुक्काम ठोकून, एका काळ्याकभिन्न रात्री आपल्या मावळ्यांसह रामसेजच्या तटाला भिडला आणि पहाट व्हायच्या आत पुन्हा रामसेजवर भगवा फडकवला! रामसेजवरील मराठ्यांच्या जयघोषांनी अवरंगजेबाची झोप उडाली. त्याला शिवाजीराजांच्या एका पत्रातील वाक्ये आठवली. ‘‘आमचा एक एक किल्ला एक एक वर्ष लढेल! आमच्याकडे 350 किल्ले आहेत. मराठी मुलुख जिंकताना तुझी उमर सरून जाईल.’’
नाशिक-पेठ रस्त्यावर नाशिकपासून 15 कि.मी.वर आशेवाडी गावाजवळ किल्ले रामसेज आजही ताठ मानाने उभा आहे. सध्या किल्ल्यावर श्रीरामाचे मंदिर आहे. किल्ल्यावर नऊ लहान मोठी तळी आहेत. यातील रामतळे महत्त्वाचे. सध्या किल्ल्याचे अस्तित्व दर्शविणारे फारच थोडे अवशेष शिल्लक आहेत. पण छत्रपती संभाजी राजांवरील स्वामिनिष्ठेचे प्रतीक म्हणून किल्ले रामसेज इतिहासात अजरामर ठरला आहे.
किल्ल्यावर ठराविक अंतरापर्यंत वाहनाने जाता येते. नाशिक भेटीच्या वेळी ‘किल्ले रामसेज’ला आवर्जून भेट द्या. आणि औरंग्याच्या सेनासागराला साडेपाच वर्षे झुंजवणार्‍या किल्ले रामसेज आणि त्यावरील आनाम मावळ्यांसमोर नतमस्तक व्हा!

solapur pune pravasi sangatana