झुकझुकगाडीचा प्रवास कोल्हापूर ते गोवा

01/03/2012 13:53
कोल्हापूर - कोल्हापूर ते गोवा प्रवास कधीच कंटाळा न येणारा; पण हाच प्रवास झुकझुकगाडीतून करता आला तर तो अधिकच आनंदी ठरणारा. आता प्रवासाचा हा आनंद घेता येणार आहे. कारण कोल्हापूर ते मडगाव (गोवा) ही उन्हाळी स्पेशल रेल्वेसेवा 15 मार्चच्या दरम्यान सुरू होणार आहे.

सुरवातीला आठवड्यातून एकदा असणारी ही सेवा प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला तर पुढे नियमित होऊ शकणार आहे. याचबरोबर आता कोल्हापूरहून सोलापूरला जायलाही रोज सायंकाळी सहाच्या सुमारास दुसरी रेल्वे सुरू होणार आहे. कोल्हापूर-मडगावसाठी सध्या आठवड्यातून एक दिवस नियोजन चालू असून रात्री नऊच्या सुमारास ही रेल्वे सुटेल. सकाळी सातच्या सुमारास ही रेल्वे गोव्यात पोहोचेल. कोल्हापुरातून गोव्याला जाणारे पर्यटक खूप आहेत. सध्या खासगी वाहने, लक्‍झरी, कदंब सेवेमार्फत ये-जा सुरू आहे; मात्र खास रेल्वे झाल्यास प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

कोल्हापूर-सोलापूर ही दुसरी रेल्वेही 15 मार्चच्या आसपास सुरू होणार आहे. हरिप्रिया एक्‍स्प्रेस रोज सायंकाळी चारच्या सुमारास तिरुपतीहून येथे येते. त्यानंतर ही रेल्वे दुसऱ्या दिवसापर्यंत थांबून राहते. हीच रेल्वे सायंकाळी सहाच्या सुमारास सोलापूरला जाणार आहे व दुसऱ्या दिवशी पहाटे सोलापूरहून सुटून सकाळी दहापर्यंत कोल्हापुरात पोहोचणार आहे. सध्या रोज सकाळी सोलापूरला एक एक्‍स्प्रेस येथून सुटते. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद व एसटीच्या तुलनेत दर कमी असल्याने ही दुसरी उन्हाळी रेल्वे सोलापूरला सुरू होणार आहे.

solapur pune pravasi sangatana