सोलापूर रेल्वे विभागाला 538 कोटींचे विक्रमी उत्पन्न

25/04/2011 13:03

सोलापूर - सोलापूर विभागाला नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात दिलेले 521 कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट सोलापूर रेल्वे विभागाने पार केले. विभागाला 538 कोटींचे उत्पन्न मिळाले असल्याने ही एक नवी विक्रमी कामगिरी सर्व विभागातील सर्वच रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे पार पाडल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी दिली. मागच्या वर्षी विभागाने 473 कोटी रुपये उत्पन्न मिळविले होते.

गत आर्थिक वर्षात 312 लाख प्रवाशांनी रेल्वेद्वारे प्रवास केला. 298 लाख प्रवाशांचे उद्दिष्ट होते, ते लीलया पार पाडीत 9 टक्के वाढ विभागाने मिळविली आहे.
प्रवासी वाहतुकीमुळे 152 कोटी रुपये रेल्वेला प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी 131 कोटी रुपये मिळाले होते. ही 15 टक्के वाढ झाली आहे.

मालवाहतुकीद्वारे रेल्वेला 397 कोटी रुपये मिळाले. मागील वर्षी 326 कोटी रुपये प्राप्त झाले होते. एकूण 12 टक्के वाढ यातही झाली आहे. तिकीट तपासणी उत्पन्नात एकूण 24 टक्के वाढ झाली असून यावर्षी 78 विभागीय रेल्वेतील सर्व मालधक्‍क्‍यावर संगणकीय टर्मिनल मॅनेजमेंट सिस्टिम लागू करण्यात आली आहे. याशिवाय कवठेमहांकाळ व बार्शी स्टेशन येथे नवीन माल धक्‍क्‍याची सुरवात झाली आहे. सोलापूर स्टेशनवर "जनआहार' तर दौंड स्टेशनवर "फूड प्लाझा'ची सुरवात झाली आहे. विभागातील लातूर व उस्मानाबाद स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनचा विस्तार झाला आहे. भिगवण येथील मालधक्‍क्‍यांमध्ये सुधारणा झाली आहे, अशी माहिती श्री. गायकवाड यांनी दिली.

यावेळी वाणिज्य व्यवस्थापक बी. एल. कोरी, जनसंपर्क निरीक्षक अनिल वालदे उपस्थित होते.


solapur pune pravasi sangatana